
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे तसेच जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, गेल्या 20 तासांहून अधिक काळ ही स्थिती कायम आहे. खालापूर टोल नाक्यापासूनच वाहतूक संथ गतीने सुरू असून खोपोली ते लोणावळा घाट सड्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काल संध्याकाळी एक केमिकल टँकर उलटल्याने या वाहतूक कोंडीला सुरुवात झाली होती. मात्र अपघाताला जवळपास 20 तास उलटून गेले असतानाही अद्याप वाहतूक सुरळीत झालेली नाही. विशेष म्हणजे संध्याकाळपर्यंतही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर तसेच मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल नाक्यापासून लोणावळ्यापर्यंत पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे दोन्ही मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीबाबत कोणतीही पूर्वसूचना, संदेश किंवा पर्यायी मार्गांची माहिती न दिल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तासन्तास वाहनांत अडकून पडलेल्या प्रवाशांना पाणी, अन्न किंवा इतर मूलभूत सुविधांचाही अभाव जाणवत आहे. अशा परिस्थितीतही खालापूर टोल नाक्यावर टोल वसुली सुरूच असल्याने प्रवाशांचा रोष अधिक वाढला आहे. “आम्ही तासन्तास अडकलो आहोत, पुढे रस्ता बंद आहे, तरीही टोल का आकारला जातो?” असा सवाल अनेक प्रवाशांनी टोल कर्मचाऱ्यांना केला. काही प्रवाशांनी थेट जाब विचारत संताप व्यक्त केला आहे. गेल्या 20 तासांपासून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने प्रशासन आणि वाहतूक यंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकले असून, परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याची मागणी केली जात आहे.





























































