
तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रिया राबवण्यात आली होती. राज्याच्या अंतिम मतदार यादीतून तब्बल ९७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी एसआयआर प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे आणि कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांची पडताळणी करण्यात आली. तांत्रिक सॉफ्टवेअर आणि प्रत्यक्ष घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणातून असे समोर आले की, लाखो मतदारांची नोंदणी एकापेक्षा जास्त ठिकाणी होती किंवा अपात्र असतानाही त्यांची नावे यादीत कायम होती.
या मोठ्या कपातीनंतर तामिळनाडूतील एकूण मतदारांची संख्या आता ६.११ कोटींवर आली आहे. विशेष म्हणजे, नवीन आकडेवारीनुसार तामिळनाडूमध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, ज्या पात्र नागरिकांची नावे चुकून वगळली गेली असतील, त्यांना पुन्हा नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले जातील.


























































