
सरकारचा हुकूमशाही कारभार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात नेपाळमध्ये आज मोठा उद्रेक झाला. सरकारच्या मनमानीला वैतागलेल्या तरुणाईला सोशल मीडियावरील बंदीचे निमित्त मिळाले आणि अवघी ‘जेन झी’ रस्त्यावर उतरली. या आक्रमक तरुणांनी पंतप्रधान केपी ओली यांच्या घरावर तुफान दगडफेक करत संसदेच्या इमारतीला आग लावली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 20 जण ठार, तर 400 हून अधिक जखमी झाले आहेत. तरुणांच्या उग्र आंदोलनाचा धसका घेतलेल्या सरकारने देशभर संचारबंदी लागू केली आहे. राजधानी काठमांडूमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आले असून दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, नेपाळ सरकारने मेटा, अल्फाबेट, एक्स, इन्स्टाग्राम, यूटय़ूबसह 26 सोशल मीडिया कंपन्यांना नेपाळच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी एक आठवडय़ाची मुदत दिली होती. मात्र या कंपन्यांनी ती पाळली नाही. त्यानंतर सरकारने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍपसह बहुतेक सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी आणली.
या बंदीमुळे केवळ संवादच बंद झाला असे नाही, तर रोजगारासाठी सोशल मीडियावर अवलंबून असलेल्या लाखो तरुणांपुढे पोटापाण्याचे संकट उभे राहिले. परिणामी हे तरुण रस्त्यावर उतरले.
‘हामी नेपाल’ने केले आंदोलनाचे नेतृत्व
नेपाळ सरकारने सोशल मीडियावर टाच आणताच ‘नेपो किड’ आणि ‘नेपो बेबीज’ हे दोन हॅशटॅग सुरू झाले. ‘हामी नेपाल’ या तरुणांच्या संघटनेने या आंदोलनाचे नेतृत्व केले. जनरेशन झेड म्हणजेच 18 ते 30 वयोगटातील तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते. ‘हामी नेपाल’चे अध्यक्ष सुधन गुरूंग यांनी आमची लढाई सरकारी धोरण आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचे सांगितले.
गृहमंत्र्यांचा राजीनामा
तरुणांचे आंदोलन व त्यात झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी घेऊन नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला आहे. देशातील अराजकी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान ओली यांनी आज आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत लेखक यांनी ओली यांच्याकडे राजीनामा सोपवला.
आम्हाला देशात बदल हवा!
तरुणांच्या मनात सरकारचा मनमानी कारभार व भ्रष्टाचाराविरुद्ध आधीच चीड होती. त्यामुळे सोशल मीडियासाठी सुरू झालेले हे आंदोलन अधिकच पेटले आणि या आंदोलनाने भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे रूप घेतले. आम्हाला देशात बदल हवा आहे. आतापर्यंत आमच्या मागच्या पिढय़ांनी सहन केले, मात्र आमची पिढी हे खपवून घेणार नाही, असा आंदोलकांचा पवित्रा आहे.
हिंदुस्थानी सीमेवर कडक पहारा
सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळमध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने आपल्या सीमेवरील पहारा कडक केला आहे. सीमेवरील गस्तीत वाढ करण्यात आली असून अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.