
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह ताडोबा जंगल सफारीसाठी गेले असता, पुन्हा त्यांची आवडती सुपरमाॅम जुनाबाई वाघीण भेटली. सचिनची ताडोबामधील ही आठवी सफारी होती. सचिनने कायमच ताडोबामध्ये सफारीदरम्यान त्याचे फोटो सोशल माध्यमावर शेअर केले आहेत.
27 मार्चला सचिनने मदनापूर बफर गेटमधून प्रसिद्ध जुनाबाई वाघीणीचे दर्शन घेतले. मुख्य म्हणजे जुनाबाई तिच्या चार बछड्यांसह होती. जुनाबाईला पाहून सचिनचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. जुनाबाईला ताडोबामध्ये सुपरमाॅम या नावाने ओळखले जाते. जुनाबाईबद्दल सचिनला विशेष आकर्षण असून, तिचे प्रत्येक भेटीत दर्शन होणे ही त्याच्यासाठी मोलाचा क्षण आहे.
ब्रह्मपुरी वन विभागाने ताडोबालगतच्या जंगलात पर्यटन वाढावे, या उद्देशाने कच्चेपार येथे सफारी सुरू केली. या परिसरातही वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. हा परिसर ताडोबाच्या तुलनेत अगदी शांत समजला जातो. यापूर्वी या गेटवरून मर्यादित सफारी सुरू होती. मात्र, ते प्रसिद्ध नव्हते सचिनच्या सफारीने प्रादेशिक गेट चर्चेत आला. या सफारीदरम्यान सचिनला वाघाचे दर्शन झाले. या परिसरात मी पुन्हा नक्की येणार, अशी ग्वाही त्याने दिली.



































































