वाहनचोरीच्या गुन्ह्यासंदर्भात मास्टर प्लॅन; गुन्हे शाखेकडून दोन पथकांची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नवनाथ शिंदे

पुणे शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यासाठी खास दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. पाच अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पथकामध्ये 12 ते 14 कर्मचारी काम करणार आहेत. प्रत्येक झोननुसार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना काम करण्याचे सूचित करण्यात आले आहे. वाहनचोरीसंदर्भात गुन्हे शाखेने कंबर कसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणांसह उपनगरांमध्ये दिवसेंदिवस वाहनचोरीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज 5 ते 7 दुचाकी आणि एखादी चारचाकीची चोरी होत आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने वाहन चोरट्यांविरुद्ध विशेष मोहिम राबविण्याच्या दृष्टीकोनातून मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार झोन एक ते तीन आणि चार व पाचमध्ये ही दोन पथके कार्यरत राहणार आहेत. शहरातून सर्वाधिक वाहन चोरीच्या घटना झालेली ठिकाणे, चोरी करण्याच्या पद्धतीनुसार चोरट्यांचा बिमोड केला जाणार आहे. संबंधित पथकांकडून काम सुरु करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे.

वाहन चोरट्यांकडून गर्दीची ठिकाणे हेरली जात आहे. त्यानंतर बनावट चावीचा वापर करुन वाहनांची चोरी केल्याचे अनेक घटनांवरुन निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहनांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. पार्किंगमध्ये जागा नसल्यास अनेकांकडून दुचाकी अथवा चारचाकी वाहने कोठेही पार्क केली जातात. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांकडून वाहनचोरी केल्याचेही दिसून आले आहे. मध्यवर्ती ठिकाणे, उपनगर, वर्दळ नसलेल्या ठिकाणांहून वाहनचोरी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून नियुक्त केलेल्या दोन पथकांच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

वाहनचोरीच्या घटना रोखण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक झोननुसार ही पथके काम करणार असून वाहन चोरट्यांविरुद्ध योजना आखण्यात आली आहे. सर्वाधिक वाहन चोरीच्या ठिकाणांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार पथकांनी कामाला सुरुवात केली आहे.
– बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

वाहनचोरीच्या घटना

कालावधी                            वाहनचोरीच्या एकूण घटना               गुन्हे उघडकीस

  • जानेवारी ते डिसेंबर 2019                    1441                               552
  • जानेवारी ते ऑक्टोबर 2020                   708                                221