
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत उपकरणे, मतदान बूथवरील कर्मचाऱयांवर होणारा खर्च आणि मतदान साहित्याची वाहतूक, पोलीस सुरक्षा यावर होणारा खर्च बराच वाढला आहे. देशभरातील 90 कोटी मतदारांच्या बोटाला मतदानानंतर लावल्या जाणाऱया शाईच्या खरेदीसाठीच 33 कोटी रुपये खर्च होणार आहेत. नव्या अभ्यासानुसार या लोकसभा निवडणुकीत एका मतदाराच्या मतासाठी 50 रुपये खर्च होणार आहेत.
पहिल्या लोकसभेसाठी एका मतासाठीचा खर्च होता फक्त 1 रुपया. तो आता 50 पटीने वाढला आहे. लोकसभेच्या पहिल्या 6 निवडणुकांत हा खर्च 1 रुपयावरच स्थिर होता. पण आता सर्व परिस्थिती बदलली आहे. प्रत्येक वस्तूची किंमत कितीतरी पटीने वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या 17 व्या लोकसभा निवडणुकीचा खर्च प्रचंड असेल हे मात्र निश्चित. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एका मतासाठी खर्च आला होता 46 रुपये 40 पैसे. यंदा हाच खर्च 50 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.
मतदारांची संख्या अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक
हिंदुस्थानी लोकसंख्येचे विशाल रूप पाहता यंदा 90 कोटी मतदार लोकसभेतील आपला मताधिकार बजावू शकणार आहेत. हा आकडा अमेरिका, ब्राझील आणि इंडोनेशिया या तीन देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. हे तीन देश लोकसंख्येच्या बाबतीत जगात तिसऱया, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
वर्ष खर्च (रुपयांत)
- 1951-52 0.60
- 1957 0.30
- 1962 0.34
- 1967 0.43
- 1971 0.42
- 1977 0.72
- 1980 1.54
- 1984 2.04
- 1989 3.09
- 1991 7.02
- 1996 10.08
- 1998 11.00
- 1999 15.30
- 2004 15.30
- 2009 15.54
- 2014 46.54
























































