माथेरानच्या पर्यावरणाला घोड्यांच्या लिदीचा विळखा; प्रदूषणाबाबत हरित लवादाचा नगर परिषद, अश्वपाल संघटनांना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्गाने भरभरून दिलेल्या माथेरानच्या पर्यावरणाला घोड्यांच्या लिदीचा विळखा पडला आहे. माथेरानमध्ये कोणतेही प्रदूषणकारी उद्योगधंदे तसेच पेट्रोल, डिझेलवरील वाहने नसताना तेथील हवा, पाणी आणि माती प्रदूषित झाली कशी, असा सवाल हरित लवादाने विचारला असून नगर परिषद व अश्वपाल संघटनांना दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घोड्यांच्या लिदीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सुनील शिंदे, केतन रामाने यांनी माथेरानचे पर्यावरण वाचवण्यासाठी २०२४ मध्ये हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर पुणे येथील लवादाचे न्यायमूर्ती डी. के. सिंह आणि डॉ. सुजितकुमार वाजपेयी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या याचिकेत माथेरानमधील घोड्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्या लिदीच्या अनियंत्रित व्यवस्थापनामुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेमुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जानेवारी महिन्यात राष्ट्रीय हरित लवादात सादर केलेल्या अहवालात माथेरानमधील हवा, पाणी आणि माती सर्वच प्रदूषित होत असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. विशेष म्हणजे हा अहवाल लोणेरे, माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने शास्त्रोक्त पद्धतीने तयार केला आहे.