माथेरानच्या राणीला दिवाळीत सुमारे दोन लाखांची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सात महिन्यांच्या टाळेबंदीनंतर पर्यटक आणि नागरीकांसाठी 4 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या माथेरानच्या राणीला दिवाळीत बक्कळ कमाई झाली आहे. अमन लॉज ते माथेरान अशा इतर दिवसांत चार शटल फेऱ्य़ा तर विकेण्डला शनिवारी आणि रविवारी चार अतिरिक्त फेऱ्य़ा अशा एकूण आठ शटल फेऱ्य़ा चालविण्यात येत आहेत.

त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर माथेरानच्या राणीला जादा प्रवासी लाभले असून पंधरवडय़ात तिला 2 लाख 66 हजार 121 रूपयांची कमाई झाली आहे. तर दिवाळीच्या चार दिवसांत तिला 1 लाख 73 हजार 704 रूपयांची कमाई झाली आहे.

सात ते आठ महिन्याच्या विलंबानंतर पुन्हा 4 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या माथेरानच्या मिनी ट्रेनला आता हळूहळू चांगला प्रतिसाद मिळत आहे. 14 नोव्हेंबरपासून शनिवारी आणि रविवारी विकेण्डला आणखी चार फेऱ्य़ा अशा एकूण आठ फेऱ्य़ा चालविण्यात येत आहेत.

सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले पुन्हा माथेरानला वळत असून त्यासाठी विकेण्डला दिवाळीच्या आनंद द्विगुणित करण्यासाठी पुन्हा माथेरान बहरले आहे. माथेरानच्या राणीला 4 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर अशा साधारण पंधरा दिवसांत मध्य रेल्वेला 2 लाख 66 हजार 121 रूपयांचे एकूण उत्पन्न मिळाले आहे.

तर दिवाळीत 13 नोव्हेंबर रोजी 8,398 रूपये, 14 नोव्हेंबर रोजी 36,973 रूपयांचे उत्पन्न, 15 नोव्हेंबर रोजी 66,103 रूपयांचे उत्पन्न तर 16 नोव्हेंबर रोजी 62,230 रूपयांचे उत्पन्न असे एकूण 1 लाख 73 हजार 704 रूपयांचे उत्पन्न दिवाळीच्या चार दिवसांत मध्य रेल्वेला मिनी ट्रेनमुळे मिळाले असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.