अभूतपूर्व जल्लोषात धावली माथेरानची मिनी ट्रेन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तांत्रिक परीक्षेत पास झाल्यानंतर आज  माथेरानची राणी ठुमकत.. लचकत.. आणि मान मुरडत हिरव्या रानातून धावली. फटाक्यांची आतषबाजी करीत अभूतपूर्व जल्लोषात मिनी ट्रेन  माथेरानहून अमन लॉजकडे सकाळी निघाली तेव्हा प्रवाशांनी ‘हिप हिप हुर्रे’ करीत स्वागत केले. बच्चे कंपनीचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. ऐन थर्टीफस्टच्या तोंडावर तब्बल सहा महिन्यांनंतर यार्डातील माथेरानची राणी पुन्हा ट्रॅकवर आल्याने नववर्षाचे स्वागतही मोठय़ा उत्साहात होणार आहे.

मुसळधार पावसात दरडी कोसळल्याने माथेरानची मिनी ट्रेन बंद होती. त्याचा पर्यटनावर मोठा परिणाम झाला. निसर्गरम्य माथेरानचे वैभव असलेली ही गाडी पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. शुक्रवारी रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ट्रेनची चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी होताच आजपासून ट्रेन धावण्यास सुरुवात झाली. इंजिनाला फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते. आकर्षक रंग, छोटे डबे आणि छोटेसे इंजिन याचे मोठे आकर्षण पर्यटकांना आहे.

माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी श्रीफळ वाढवून हिरवा झेंडा दाखवला आणि राणीचा सकाळी 8.15 मिनिटांनी थाटात प्रवास सुरू झाला. पर्यटकांना घेऊन जाणारी ही मिनी ट्रेन अमन लॉजपर्यंत धावली.

या ट्रेनला एकूण 6 बोगी असून एका बोगीमध्ये 30 प्रवासी बसतील एवढी व्यवस्था आहे. आज दिवसभरात मिनी ट्रेनच्या एकूण आठ फेऱ्या झाल्या. त्यात 781 पर्यटकांनी राणीचा डामडौल अनुभवला.

यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद सावंत, नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, मुख्याधिकारी रामदास कोकरे, गटनेते प्रसाद सावंत, मनोज खेडकर, विवेक चौधरी, नगरसेवक शिवाजी शिंदे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वेळापत्रक

अमन लॉज ते माथेरान स्टेशन – सकाळी 8.40, 9.55, 10.45, 11.55, दुपारी 12.45, 2.00, 3.05, 3.55. (शनिवार आणि रविवारी संध्याकाळी  4.45, 5.35). माथेरान ते अमन लॉज स्टेशन- सकाळी 8.15, 9.30, 10.20, दुपारी 12.00, 1.35, 2.40, 3.30. (शनिवार आणि रविवार संध्याकाळी 4.20 आणि 5.10)