
माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेली माथेरानची राणी ही मिनी ट्रेन आता मोठ्या थाटात हायड्रोजन इंजिनवर धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाने हायड्रोजन फॉर हेरिटेज या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत देशातील निवडक ऐतिहासिक रेल्वेमार्गांना आधुनिक हरित तंत्रज्ञानाशी जोडण्याचा निर्णय घेतला असून त्यात नेरळ-माथेरान हिल रेल्वेचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार लवकर माथेरानच्या राणीसाठी हायड्रोजन इंजिनची चाचणी घेण्यात येणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये हायड्रोजन फॉर हेरिटेज या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत देशातील निवडक ऐतिहासिक रेल्वेमार्गांना आधुनिक हरित तंत्रज्ञानाशी जोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या योजनेत नेरळ-माथेरान हिल रेल्वेचा समावेश करण्यात आला असून ऐतिहासिक वारसा अबाधित ठेवत स्वच्छ ऊर्जेचा स्वीकार करण्याची दिशा निश्चित झाली आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या दाट जंगलातून, धुक्याच्या कुशीतून आणि खोल दऱ्यांच्या साक्षीने शतकाहून अधिक काळ निसर्गाशी मैत्री करीत धावणारी माथेरानची हेरिटेज मिनी ट्रेन आता इतिहासातील आणखी एका महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपली आहे.
हायड्रोजन इंजिनामुळे कार्बन उत्सर्जनात मोठी घट होणार आहे. सह्याद्रीच्या निसर्गावर होणारा पर्यावरणीय ताण कमी होण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात माथेरानची ओळख केवळ हेरिटेज हिल स्टेशन म्हणूनच नव्हे, तर ग्रीन टुरिझम मॉडेल म्हणूनही निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी लाखो पर्यटक या मिनी ट्रेनच्या प्रवासासाठी माथेरानमध्ये येतात. घाटातील धुकं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि दऱ्यांमधून घुमणारी मिनी ट्रेनची शिट्टी हा अनुभव पर्यटकांसाठी आयुष्यभराची आठवण ठरतो. आता या प्रवासाला हरित ऊर्जेची जोड मिळणार आहे.
हरयाणातील जिंद-सोनिपत मार्गावरील हायड्रोजन रेल्वे प्रकल्पाला गती मिळाल्यानंतर माथेरानच्या मिनी ट्रेनसाठीही अशाच तंत्रज्ञानाचा मार्ग खुला झाला आहे. मात्र प्रत्यक्षात हायड्रोजन इंजिन माथेरानच्या रुळांवर कधी धावणार, याबाबत रेल्वे प्रशासनाने अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
माथेरान म्हणजे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर सह्याद्रीच्या जैवविविधतेचा अमूल्य ठेवा आहे. वाहनमुक्त शहर म्हणून माथेरानची जगभर ओळख आहे. अशा संवेदनशील पर्यावरणाला जपत धावणाऱ्या मिनी ट्रेनला आता हरित ऊर्जेची साथ मिळणार असल्याने पर्यावरणप्रेमी आणि रेल्वेप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.





























































