
नागमोडी वळणे, खोल दरी आणि हिरवाईचा आनंद लुटत पर्यटक एसटी महामंडळाच्या मिनी बसमधून निसर्गरम्य माथेरानल 1 पोहोचतात तेव्हा त्यांना वेगळीच अनुभूती येते. स्वस्तात मस्त प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारा माथेरानचा हा ‘गरीब रथ’ आता ‘तरुण’ झाला आहे. मिनी बससेवेला आज १७ वर्षे पूर्ण झाली असून नॉनस्टॉप धावणाऱ्या बसबरोबर रहिवासी आणि पर्यटक यांचे अनोखे नाते जुळले आहे. यापुढेही हे नाते आणखी दृढ होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
विविध भागांतून आलेले पर्यटक नेरळ स्थानकात उतरतात तेव्हा त्यांना माथेरानला जाण्यासाठी रेल्वे तसेच टॅक्सी यांबरोबरच मिनी बसची सेवादेखील उपलब्ध आहे. ११ ऑक्टोबर २००८ रोजी नेरळ ते माथेरान अशी ३४ आसनांची बस सुरू झाली. रोज त्याच्या ५ फेऱ्या होतात. कर्जत डेपो ते नेरळच्या खांडा भागापर्यंतदेखील ५ फेऱ्या होत असून पर्यटकांबरोबरच माथेरानमधील रहिवाशांनासुद्धा मिनी बसचा फायदा होत आहे.
तिकीट फक्त ३१ रुपये
नेरळहून माथेरानला टॅक्सीने जायचे असेल तर एका प्रवाशामागे १०० रुपये एवढा दर आहे. पण मिनी बससाठी फक्त ३१ रुपये मोजावे लागतात. त्यामुळे अनेकांनी या बसला पसंती दिली आहे. माथेरानमधील विद्यार्थी, महिला, नोकरदार यांना कमी खर्चात नेरळपर्यंत पोहोचता येते. प्रवासी तसेच पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन बसच्या फेऱ्यांची संख्या वाढवली तर त्याचा मोठा फायदा होणार आहे.
ही तर आमची शान…
विद्यार्थी, महिला आणि पर्यटकांच्या दृष्टीने नेरळ-माथेरान मिनी बस म्हणजे आमची शान आहे. आम्हाला सुरक्षित प्रवास त्यातून करता येतो. ऊन असो की वारा.. पाऊस रोज बसची सेवा उपलब्ध होत असल्याने ‘गरीब रथ’ आमची जणू जीवनवाहिनी ठरली आहे. १७ वर्षांच्या या सेवेला आमच्या शुभेच्छा.
कल्पना पाटील (माजी मुख्याध्यापक)