
कबड्डीचे दिमाखदार आणि दर्जेदार आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळी मंडळाचा शतकोत्तर कबड्डीच्या चढाई-पकडींचा थरार येत्या 14 ते 18 एप्रिलदरम्यान रंगणार आहे. 101 वर्षांच्या मावळी मंडळाच्या 73 व्या राज्यस्तरीय पुरुष आणि महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेच्या संघनोंदणीला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत पुरुष गटात 64 आणि महिला गटात 16 अशा 80 संघांना प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रतिष्ठत स्पर्धेत विजेत्यांवर पाच लाख रुपयांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव केला जाणार असल्याची माहिती मावळी मंडळाने दिली.
मावळी मंडळ म्हणजे कबड्डी हे समीकरण महाराष्ट्राच्या सर्वच कबड्डीप्रेमींच्या परिचयाचे आहे. कबड्डीला आपुलकी आणि प्रेम देणाऱया मावळी मंडळाच्या स्पर्धेत सहभागी होणे हे प्रत्येक कबड्डी संघाचे स्वप्न असते. ते स्वप्न पुन्हा एकदा साकार करण्यासाठी राज्यभरातील 80 पेक्षा अधिक संघ लाल मातीत आपला खेळ दाखवतील, अशी माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह दिनेश मोरे यांनी दिली. यंदा पुरुष आणि महिला गटातील विजेत्याला 51 हजार रुपये तर उपविजेत्या संघांना प्रत्येकी 31 हजार रुपये आणि चषक देऊन गौरविले जाणार आहे. विशेष म्हणजे पुरुष आणि महिला संघांना समसमान रोख पुरस्कार दिला जाणार आहे.
या स्पर्धेत पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर या जिह्यातील नामवंत संघ नेहमीच आवर्जून सहभागी होत असल्यामुळे ही स्पर्धा थरारक होते. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 9920776361, 9867421524,9653175970 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


























































