
नगर जिल्ह्यात 1 जून ते 11 ऑक्टोबर या काळात सरासरी 668.5 मिलिमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या दीडपट आहे. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या काळात सरासरी 472.4 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र 11 ऑक्टोबरपर्यंतच 668.5 मिमी पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीपेक्षा तब्बल 141.5 टक्के एवढा जास्त पडला आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. पाथर्डीत तर ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, नगर शहरातही शनिवारी (दि. 9) विक्रमी 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीही जिल्ह्यात सरासरीच्या दीडपटपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात जून ते डिसेंबरपर्यंत सरासरी 547.3 मिमी पाऊस होत असतो. गतवर्षी तो 787.9 मिमी म्हणजे सरासरीच्या 166.8 टक्के जास्त झाला होता. यावर्षी डिसेंबरअखेर पडणारा पाऊस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच पडला आहे. सर्वांत जास्त पाऊस पाथर्डी तालुक्यात झाला आहे. पाथर्डीत सरासरी 498.5 मिमी पाऊस पडतो. यावर्षी तेथे 942 मिमी म्हणजे सरासरीच्या 189 टक्के जास्त पाऊस झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे पावसाची सरासरी वेगाने वाढत असून, यंदा गेल्या चार ते पाच वर्षांमधील रेकॉर्डब्रेक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.





























































