
कल्याण डोंबिवली, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, उल्हासनगर महापालिकांच्या महापौर -उपमहापौरपदाची निवडणूक उद्या मंगळवारी होत आहे. महापौर, उपमहापौर निवड गुप्त मतदानाऐवजी हात वर करून होणार आहे. सभागृहात बहुमत कुणाकडे आहे याची मोजणी करून महापौर उपमहापौर निवडीची घोषणा केली जाणार आहे. यासाठी कोकण आयुक्तांनी नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी हे पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
विरोध गुंडाळून ठाण्यात भाजप सत्तेत सहभागी
ठाणे महापालिकेत महापौरपद मिळावे यासाठी भाजपने शिंदे गटावर दबाव आणला होता. पद मिळाले नाही तर विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपने आपला विरोध गुंडाळुन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिंदे गटाचा महापौर तर भाजपचा उपमहापौर होणार आहे. ठाण्याच्या महापौरपदासाठी शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर गायकवाड तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या कृष्णा पाटील यांचेच अर्ज दाखल झाले आहेत. अडीच वर्षांत शिंदे गटाने दोन महापौर करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपनेही अडीच वर्षांत दोन उपमहापौर करण्याचा फॉर्म्युला ठरवला आहे. ठाणे महापालिकेत महापौर तसेच उपमहापौरपद हे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार अडीज वर्षे दिले जात होते. गेले अनेक वर्षे हाच फार्म्युला असताना यंदा मात्र ही परंपरा मोडीत काढून सवा सवा वर्षे असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.
उल्हासनगरमध्ये बिनविरोध महापौर
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत ७८ पैकी ४० जागांवर शिंदे गटाने तर ३७जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. महापौर पदासाठी शिंदे गटाच्या अश्विनी निकम तर भाजपचे अमर लुंड यांचा उपमहापौरपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची औपचारिकता राहिली आहे.
केडीएमसीत महायुती
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडून एकूण १२२ नगरसेवक निवडून आले आहेत. महापौर निवडीसाठी शिंदे गट, भाजप व मनसेची महायुती झाली आहे. या महायुतीकडून महापौरपदासाठी शिंदे गटाच्या नगरसेविका अॅड. हर्षाली थवील-चौधरी तर उपमहापौरपदासाठी भाजपचे राहुल दामले यांसह एकमेव अर्ज दाखल झाल्याने या दोन्ही निवडी बिनविरोध होणार आहेत. मंगळवारी केवळ औपचारीक घोषणा होईल.
मीरा-भाईंदरमध्ये भाजपविरोधात काँग्रेस शिंदे गट एकत्र
राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गटाने पालिकेच्या राजकारणात मात्र काँग्रेससोबत युती केली आहे. काँग्रेस आणि शिंदे गटाने एकत्र मीरा-भाईंदर विकास आघाडीची स्थापना केली असून काँग्रेसच्या रुबिना शेख यांनी महापौरपदासाठी तर शिंदे गटाच्या वंदना पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. भाजपच्या डिंपल मेहता यांनी महापौरपदासाठी तर ध्रुव पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला.
वसईत ‘बविआ’ची एकहाती सत्ता
वसई-विरार महापालिका निवडणुकीत ११५ पैकी बहुजन विकास आघाडीने ७० जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. भाजपने ४३, काँग्रेस १ व शिंदे गट १ असे नगरसेवक निवडून आले आहेत. बहुजन विकास आघाडीकडून महापौरपदासाठी अजीव पाटील आणि प्रफुल्ल साने यांनी तर भाजपकडून महापौरपदासाठी दर्शना त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर उपमहापौरपदासाठी बविआकडून मार्शल लोपीस, कन्हैया भोईर तर भाजपकडून नारायण मांजरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.


























































