
प्रसारमाध्यमांपुढे बेताल बडबड करणारे भाजपचे मंत्री नितेश राणे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्याविरुद्ध माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने समन्स जारी करत सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते; मात्र राणे सुनावणीला गैरहजर राहिल्याने माझगाव कोर्टाने नितेश राणेंविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावले आहे. तसेच 2 जून रोजी सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूपंप होणार… खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे निराधार दावे करीत भाजप आमदार व राज्यमंत्री नितेश राणे बरळले होते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्याविरुद्ध माझगाव दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यावर महानगर दंडाधिकारी आरती पुलकर्णी यांच्यापुढे सुनावणी झाली. गेल्या सुनावणीवेळी नितेश राणे यांना तातडीने समन्स बजावून न्यायालयात व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना जामीनपात्र वॉरंट बजावत 2 जूनला सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
महिनाभरात दुसऱ्यांदा वॉरंट
राणेंविरुद्ध एका महिन्यात न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीनपात्र वॉरंट बजावले आहे. यापूर्वीही खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात गैरहजर राहिल्याबद्दल न्यायालयाने राणे यांच्या नावे जामीनपात्र वॉरंट काढले होते. पुढील सुनावणीला राणे गैरहजर राहिल्यास न्यायालय अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हे आहेत.