
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मैदान उपलब्ध करून न दिल्यामुळे ही स्पर्धा होऊ शकलेली नाही. यामुळे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 250 महाविद्यालयांतील खेळाडू विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. एमसीएच्या या आडमुठेपणाला युवासेनेने विरोध केला आहे.
मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा डिसेंबरपर्यंत संपते. पण मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून दिलेले नसल्यामुळे ही स्पर्धा सुरूच झालेली नाही. या एमसीएच्या आडमुठेपणाविरोधात युवासेना सिनेट सदस्यांनी उच्च, तंत्र शिक्षणमंत्री रवींद्र वायकर यांची आज भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने लक्ष घालून एमसीएला समज देऊन आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला मैदाने उपलब्ध करून द्यावीत, अशी आग्रही मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी रवींद्र वायकर यांच्याकडे केली. सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, मिलिंद साटम, धनराज कोहचाडे आणि कालिदास कांदळगावकर यांनी निवेदन दिले.
एमसीए आडमुठेपणा का करतेय?
गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठाचा क्रिकेट संघ दिल्लीतील आंतर विद्यापीठ स्पर्धेत असताना काही खेळाडू ‘मुंबई प्रीमिअर लीग’ स्पर्धेत खेळण्यासाठी विद्यापीठाच्या सामन्यातून माघार घेऊन परत आले होते. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा संघ हरला. स्पर्धेतून माघार घेणाऱ्या खेळाडूंवर विद्यापीठाने शिस्तभंगाची कारवाई केली. ही कारवाई मागे घ्या तरच सहकार्य करू, अशी भूमिका आता एमसीएने घेतली आहे. त्यामुळे एमसीएच्या या आडमुठे धोरणाला विरोध करून महाराष्ट्र सरकारने यात लक्ष घालावे, अशी मागणी युवासेनेने केली आहे.
























































