
आम्हाला कश्मीरवर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही. पाकिस्तानला पीओके रिकामे करावे लागेल, असं हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर आज परराष्ट्र मंत्रालयाने तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांना संबोधित करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हिंदुस्थानचे पीओकेबद्दलचे धोरण स्पष्ट केले आहे. दरम्यान, दोन दिवसाआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान पीओकेच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याबद्दल बोलले होते. यानंतर आज हिंदुस्थानने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आज पत्रकारांना संबोधित करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप मंजूर नाही. हिंदुस्थान आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवला पाहिजे. ही आमची दीर्घकाळापासूनची राष्ट्रीय भूमिका आहे. हे धोरण बदललेले नाही. पाकिस्तनाने पीओके रिकामे करावे, असंही ते म्हणाले आहेत.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात व्यापार थांबवण्याची धमकी देऊन शस्त्रसंधी घडवून आणण्यास मदत केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. या दावा हिंदुस्थानने फेटाळून लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, “पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान हिंदुस्थान आणि अमेरिकेचे नेतृत्व संपर्कात होते. परंतु व्यापारावर कोणतीही चर्चा झाली नाही.”