
राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाची जवळपास 70 टक्के पेरणी झाली असून अद्याप काही भागांत पुरेशा पावसाची शेतकऱ्य़ांना प्रतीक्षा आहे अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली असून कोकण विभागात मुसळधार पाऊस पडत आहे. संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर विभागात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पुणे व कोल्हापूर विभागात बहुतांश ठिकाणी तर नाशिक विभागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. 12 जुलैपर्यंत राज्यात 368 मि. मी. पाऊस झाला आहे.
राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या 151.33 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 105.96 लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास 70 टक्के पेरणी झाली आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाल्याने पेरणीची खोळंबलेली कामे सुरू झाली आहेत. काही ठिकाणी पेरणी झालेली ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, तीळ व कारळे ही पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहे, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
पीक पेरणी व पीकवाढीसाठी पावसाची आवश्यकता असून हंगामात शेतकऱ्य़ांना खताची कमतरता जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आले आहे. – दादा भुसे, कृषिमंत्री
विभागवार पेरणी
कोकण विभागात खरीपाचे 4.42 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 0.98 लाख हेक्टर (22.17 टक्के) क्षेत्रावर पेरणी पूर्ण.
नाशिक विभागात 21.19 लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून त्यापैकी 11.26 लाख हेक्टर (53.12 टक्के) क्षेत्रावर पेरणी.
पुणे विभागात 8.67 लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून आतापर्यंत 6.41 लाख हेक्टर (73.99 टक्के) पेरणी.
कोल्हापूर विभागात खरीपाचे क्षेत्र 8.03 लाख हेक्टर असून 6.73 लाख हेक्टर (83.77 टक्के) पेरणी.
संभाजीनगर विभागात 20.23 लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून त्यापैकी 17.52 लाख हेक्टर (86.60 टक्के) क्षेत्रावर पेरणी.
























































