
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप महायुतीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ गुरूवारी सायं. 5 वाजता कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर युवासेना प्रमुख ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याने शिर्डी मतदारसंघांमध्ये तमाम कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या सभेत ठाकरे काय बोलतात याकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
शिर्डी मतदारसंघ आणि शिवसेना असे अतूट नाते आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे व सहा पैकी दोन भाजप आमदार. तीन काँग्रेस आमदार व एक राष्ट्रवादी आमदार असे बलाबल आहे. आता पुन्हा एकदा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना या मतदारसंघात महायुतीची उमेदवारी मिळाली आहे. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी संपूर्ण मतदारसंघात महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या कार्यकर्त्यांना अधिक प्रेरणा मिळण्यासाठी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिर्डी दौ-यावर येत असून कोपरगाव येथे त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे.
यावेळी यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार सुभाष लोखंडे, सदाशिव लोखंडे संपर्क नेते आमदार नरेंद्र दराडे, कोपरगाव आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, नितीन औताडे, भाजपा तालुकाध्यक्ष शरद नाना थोरात, शिवसेना शहर प्रमुख सनी वाघ, भाजपा शहराध्यक्ष कैलास खैरे, यासह महिला आघाडी नगरसेवक पंचायत समिती सदस्य सरपंच आदींसह शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप महायुतीचे सर्वच नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेला मतदारसंघातील नागरिकांना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी केले आहे.

































































