तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

उपनगरीय मार्गावरील रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक काम करण्यासाठी मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून सुटणाऱया जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे येथून सुटणाऱया अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱया अप हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी येथून पनवेल, बेलापूरकडे जाणाऱया लोकल रद्द असणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तसेच अनेक लोकल रद्द केल्या जाणार आहेत.