परळीत महाआरोग्य शिबीराचा ७ हजार ७९१ रूग्णांनी घेतला लाभ

1
रूग्णांची जातीने चौकशी करतांना खासदार डॉ. प्रितम मुंडे.

सामना प्रतिनिधी । परळी

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य यज्ञामध्ये महाआरोग्य शिबिराचा ७ हजार ७९१ रूग्णांनी लाभ घेतला तर ४१४ रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. जिल्हयाच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी अन्य डॉक्टरांसोबत स्वतः दोन दिवस शिबीरात बसून रूग्णांची तपासणी केली, हे या शिबीराचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर काल महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले होते. आज या शिबीराचा समारोप झाला. या शिबिराला परळी, अंबाजोगाई व परिसरातील रूग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, डॉ.नितीन चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी व खासगी असे दोनशेहून अधिक डॉक्टर्स आरोग्य यज्ञात सहभागी झाले होते. शिबीरात ७ हजार ७९१ स्त्री- पुरूष रूग्णांसाठीच्या ४२ विविध स्टॉल्समधून कॅन्सर, किडनी यासह ५० हून अधिक रोगांच्या तपासण्या डॉक्टरांनी केल्या. सोनोग्राफी, इसीजी, रक्त, लघवी तपासणी, औषधी वाटप याबरोबरच शेतक-यांना आत्महत्ये पासून परावृत्त करण्याबाबत मार्गदर्शन तसेच तंबाखू व्यसनमुक्ती नियंत्रण, एड्स, मलेरिया, क्षयरोग याविषयी जनजागृती, किशोरवयीन मुला मुलींना मार्गदर्शन, महात्मा फुले जीवनदायी योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजनेविषयी रूग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.

डॉ.प्रितम मुंडेंनीही केली तपासणी
खासदार डॉ. प्रितमताई मुंडे या स्वतः त्वचारोग तज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी खासदार म्हणून या शिबीराचे उत्कृष्ट नियोजन तर केलेच शिवाय डॉक्टर म्हणून स्वतः दोन्ही दिवस इतर डॉक्टरांच्या बरोबरीने शिबीरात बसून रूग्णांच्या तपासण्या केल्या. डॉक्टर व खासदार अशा दोन्ही भूमिका अगदी सहजपणे पार पाडत असतांना त्यांच्याविषयी रूग्णांमध्ये कुतूहल निर्माण झाले

४१४ रूग्णांवर होणार शस्त्रक्रिया
महाआरोग्य शिबिरात पुढीलप्रमाणे रूग्णांनी लाभ घेतला त्यात प्रामुख्याने औषधी – ४७६, सर्जरी – ३१३, स्त्रीरोग – १४८, बालरोग १९७, त्वचारोग – ४६३, अस्थीरोग – १०५६, नेत्ररोग – १५६०, मानसोपचार – ६८, दंतरोग- २२६, असंसर्गजन्य रोग -१०२, आयुष – २६०,अग्निकर्म – २२०, कान नाक घसा – ३२२, किशोर स्वास्थ्य – ९४ संसर्गजन्य – १२६, फिजियोथेरपी- १५२, कृत्रिम अवयव – १७ आयसीटीसी – १९२, सोनोग्राफी – ४०५, ईसीजी-१६८, अपंग साहित्य- १५३ तंबाखु नियंत्रण – ५९, प्रयोगशाळा – ५५०, शस्त्रक्रिया करण्यात येणा-या ४१४ रूग्णांमध्ये जनरल सर्जरी- ७०,मोतीबिंदु २१५, स्त्रीरोग- ५७ व इतर ७२ अशा शस्त्रक्रिया होणार आहेत. जनरल सर्जरी १७ ते २२ डिसेंबर, स्त्रीरोग शस्त्रक्रिया २४ ते २९ डिसेंबर तर इतर शस्त्रक्रिया ३१ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान उप जिल्हा रूग्णालयात मोफत करण्यात येणार आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया हया आठवड्यातून दोन वेळा होणार आहे. शस्त्रक्रियांच्या तारखा संबंधित रूग्णांना कळविण्यात आल्या असून रूग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले आहे.