रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सुट्टी आणि मस्त पाऊस हे समीकरण अनुभवण्यासाठी तुम्ही जर बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर एकदा तरी रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा. मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवार १७ मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तांत्रिक कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. परळ स्थानकाच्या नव्या फलाटासाठी मध्य रेल्वेवर आठ तासांचा, तर हार्बर मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे अनेक लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या ट्रेनही ही रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवरील परळ स्थानकात नव्या फलाटांसाठीच्या तांत्रिक कामांसाठी सकाळी ९.३० ते ५.३० पर्यंत आठ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. दरम्यान धिम्या मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा स्थानकादरम्यान जलद मार्गावर व माटुंगा स्थानकानंतर पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. तसेच लोकल फेऱ्या सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.

दिवा स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी शनिवारी रात्री १२.३० ते ६.२५ पर्यंत सहा तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल या जलद मार्गावर वळवण्यात येईल. तसेच शनिवार आणि रविवारी मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस व मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावर चुनाभट्टी /वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावरील वाहतूक ११.१० ते ४.१० पर्यंत बंद असणार आहे. तसेच सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान ११.३४ ते ४.४७ पर्यंत एकही लोकल धावणार नाही. पनवेल, कुर्ला येथून काही विशेष लोकल प्रवाशांच्या सोयीसाठी सोडण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना हार्बर तिकीट आणि पासवर पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात येईल. तसेच काही लोकल फेऱ्याही रद्द करण्यात येणार आहेत.