मेघा धाडे ठरली मराठी बिग बॉसची विजेती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाईन । मुंबई 
बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा फिनाले आज पार पडला असून अभिनेत्री मेघा धाडे हीने बाजी मारत विजेतेपद पटकावले आहे. मेघाला प्रेक्षकांनी भरभरुन दिलेल्या मतांमुळे ती विजयी ठरली. मेघा हीने बिग ब़ॉस मराठीचे पहिले पर्व जिंकून इतिहास रचला आहे. मेघाला बिग बॉसकडून अठरा लाख रुपयांचा धनादेश आणि म्युझिक सिटीमध्ये एक फ्लॅट बक्षिस म्हणून मिळाला आहे.
मराठीतील काही चित्रपटात व हिंदी मालिकामंध्ये काम केलेल्या मेघाला अभिनयात तशी फार चमक दाखवता आली नाही. मात्र बिग बॉसच्या घरात आल्यापासून मेघा पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची आवडती स्पर्धक बनली होती. मेघाने बिग बॉसमध्ये प्रवेश करण्याआधी बिग बॉस हिंदीचे सर्व सिझन बघितले होते. प्रत्येक टास्कमध्ये ती पूर्ण स्ट्रॅटेजीनुसार आणि जीव तोडून खेळायची. त्यामुळे प्रेक्षकांना ती फार आवडत होती. तिच्या या चातुर्याचं खुद्द महेश मांजरेकर यांनी देखील कौतुक केलं होतं. मेघानं बिग बॉसच्या शोमध्ये जान आणली असं सांगत महेश मांजरेकरांनी तिची स्तुती केली होती.
मेघाच्या सई आणि पुष्करच्या मैत्रीची देखील घराबाहेर खूप चर्चा झाली. मेघाने कायम सईला साथ दिली मात्र तरीही अनेकदा त्यांच्यात गैरसमज झाले होते. शेवटच्या काही आठवड्यांमध्ये घरातील सर्व मंडळी मेघाच्या विरोधात झाली होती व तिच्याशी भांडत होती. त्याही परिस्थितीत मेघाने एकटीने सर्वांना तोंड देत स्वत:ची बाजू मांडली. तिचा हा निडरपणा देखील लोकांना फार आवडला होता.