
हिंदुस्थानचा महान क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. सचिनचा मुलगा आणि युवा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर लवकरच सानिया चंडोक हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 5 मार्च रोजी मोठ्या धुमधडाक्यात हा लग्नसोहळा होणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी गुजरातमधील जामनगर येथे या जोडप्याचा मेंदी आणि संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्याला चित्रपट, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. या सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.
मेंदी आणि संगीत सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी तेंडुलकर आणि चंडोक कुटुंबाने एकत्र फोटोशूटही केले. यावेळी सचिनने गोल्डन एम्ब्रॉयडरी केलेली बेज रंगाची शेरवानी, हिरवा कुर्ता आणि मॅचिंग पायजमा परिधान केला होता. तर अर्जुनने पांढऱ्या-सोनेरी रंगाच्या शेरवानी परिधान केली होती. अंजली तेंडुलकरने काळ्या आणि सोनेरी रंगाचा भरतकाम केलेला लेहेंगा घातला होता, तर सारा लाल आणि सोनेरी रंगाच्या लेहेंग्यात उठून दिसत होती. सानिया चंडोकने बेज रंगाचा सिक्विन लेहेंगा परिधान केला होता. यात ती खूपच सुंदर दिसत होती.

दरम्यान, या शाही सोहळ्याला दिग्गजांनी हजेरी लावली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा, पत्नी अनुपमा चोप्रा आणि मुलगा अग्नी देव चोप्रा यांच्यासह उपस्थित होते. तसेच क्रिकेटपटू युवराज सिंह-हेचल, हरभजन सिंग-गीता बसरा, झहीर खान-सागरिका घाटगे, अजित आगरकर-फातिमा, इराफान पठाण-सफा बेग आणि युसूफ पठाण-आफ्रीन हे दांम्पत्य यावेळी उपस्थित होते. तसेच माजी क्रिकेटपटू आणि कोच रवी शास्त्री, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित होते.
सचिन तेंडुलकरच्या घरी लगीनघाई… अर्जुन-सानियाच्या मेंदी आणि संगीत सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी #SachinTendulkar #ArjunTendulkar pic.twitter.com/wqnJHWT3ZC
— Saamana Online (@SaamanaOnline) March 4, 2026
अर्जुनची होणारी पत्नी सानिया चंडोक ही एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील आहे. ती प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात असून त्यांचे कुटुंब हॉटेल आणि आईस्क्रीम क्षेत्रातील दिग्गज ‘ग्रॅव्हिस ग्रुप’चे मालक आहेत. प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँड ‘बास्किन-रॉबिन्स’ आणि ‘द ब्रुकलिन क्रीमरी’ हे याच समूहाचे भाग आहेत. सानिया स्वतः सध्या मुंबईतील ‘मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर’ची संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.

डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये 2021 पासून तो मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे. 2026 च्या आयपीएल हंगामात तो लखनऊच्या संघातून खेळणार आहे. लखनऊने त्याला 30 लाखांच्या बेस प्राईजमध्ये करारबद्ध केले आहे.
अर्जुनची एकूण मालमत्ता 21 ते 22 कोटी रुपयांच्या आसपास आहे. अर्जुनला महागड्या गाड्यांची विशेष आवड असून तेंडुलकर कुटुंबाच्या ताफ्यात पोर्श केयेन, बीएमडब्ल्यू आय 8 आणि फेरारी 360 मोडेना यांसारख्या आलिशान गाड्यांचा समावेश आहे. सध्या अर्जुन आपल्या कुटुंबासह मुंबईतील वांद्रे येथील आलिशान बंगल्यात राहतो.
#WATCH | Maharashtra: Former Indian Cricketer Ravi Shastri attended the mehendi and sangeet ceremony of Arjun Tendulkar and Saaniya Chandhok, in Mumbai, on 3rd March. pic.twitter.com/URTHPK1Pgl
— ANI (@ANI) March 4, 2026























































