
सामना प्रतिनिधी । धुळे
मार्च संपण्यापूर्वीच तापमानाने चाळिशी गाठली आहे. कृषी महाविद्यालयाच्या हवामान विभागात मंगळवारी तापमानाची नोंद 40 अंश सेल्सिअस झाली. उन्हाची तीव्रता कायम राहणार असून पुढील काळात तापमानाचा पारा काही अंशी वाढतच जाणार आहे. उष्माघाताचा त्रास होईल म्हणून नागरिकांनी निरनिराळय़ा उपाययोजना कराव्यात. आवश्यकता नसेल तर ऊन तीव्र असतानाच्या काळात घराबाहेर पडू नये, अशा सूचना हवामान विभागाने केल्या आहेत.
धुळे शहराच्या पूर्वेला कृषी महाविद्यालय असून या महाविद्यालयाच्या हवामान शास्त्र विभागात दैनंदिन तापमानाची आणि पावसाची नोंद घेतली जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला. गारठा कमी होऊ लागल्याने उष्णता जाणवू लागली. हवामानाची नोंद होत असलेल्या विभागात पारा दिवसागणिक वाढत चालला. एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत तापमान चाळीस अंशांपर्यंत जाईल, असा अनेकांचा अंदाज होता. पण हा अंदाज फोल ठरवीत तापमानाने 26 मार्चलाच 40 अंश सेल्सिअसची पातळी गाठली. एकूणच परिस्थिती पाहता पुढील काळात तापमानाची नोंद वाढतच जाणार आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी
हवेतील शुष्कता वाढल्यामुळे उष्माघाताची बाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी टोपी, रुमाल, स्कार्प, छत्री यासारख्या साधनांचा वापर करावा. सोबत पाण्याची बाटली ठेवावी. शक्यतोवर सावली असलेल्या भागातून प्रवास करावा. उष्ण वाऱयांचा त्रास होऊ नये म्हणून सावलीसाठी मंडप किंवा शेड उभारावे. आवश्यकता नसेल तर तापमान वाढीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना हवामानाची नोंद घेत असलेल्या विभागाने केली आहे.




























































