यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस… जूनमध्येही घामाच्या धारा; हवामान विभागाचे सुधारित अंदाज जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

यंदा सरासरीहून कमी पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केली. तसेच मान्सूनच्या हंगामात महाराष्ट्रासह देशातील काही भागांत उष्णतेची लाटेसदृश स्थिती नोंदली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना यंदा पावसाच्या हंगामातही उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

भारतीय हवामान विभागाने जून ते सप्टेंबर 2026 या चार महिन्यांच्या मान्सूनचा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. देशात यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी म्हणजे सरासरीच्या 90 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वीच्या अंदाजात 92 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. तो दोन टक्क्यांनी कमी करण्यात आला असून 90 टक्के असेल असा सुधारित अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

‘मान्सून कोअर झोन’मध्ये पाऊस कमी

विशेष म्हणजे, देशातील पावसावर अवलंबून असलेल्या ‘मान्सून कोअर झोन’मध्येही पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा भाग मुख्यतः कृषीप्रधान असून खरीप हंगामासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पावसातील घट शेती, जलसाठे, वीज निर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

एल निनोचा परिणाम

हवामान विभागाने स्पष्ट केले की, प्रशांत महासागरात एल निनो स्थिती विकसित होण्याचे संकेत मिळत आहेत. एल निनोचा परिणाम साधारणतः देशातील मान्सूनवर प्रतिकूल मानला जातो. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या मान्सूनकडे कृषी क्षेत्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातही पाऊस घटणार

जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता असून महाराष्ट्रासह बहुतांश राज्यांत कमी पाऊस होईल. तसेच जूनमध्ये उष्णतेच्या लाटांचे प्रमाणही वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता असून काही मोजक्या भागांतच सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.

पुढील आठवड्यात मान्सून केरळममध्ये

देशात सध्या प्रचंड उकाडा होत असल्याने प्रत्येक जण मान्सूनची वाट पाहत आहे; परंतु देशात मान्सूनचे आगमन यंदा उशिरा होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेतील कमी दाबाच्या वादळी वाऱ्यामुळे मान्सून पुढील आठवड्यात केरळमच्या किनारपट्टीवर पोहोचेल.