
‘वेगवान विकासा’चा दिखावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलेल्या मेट्रो 2 ए अर्थात येलो लाईनच्या कामाचेही पितळ उघडे पडले आहे. मंगळवारच्या मुसळधार पावसात मेट्रो स्थानकांमध्ये जागोजागी गळती सुरू झाली. त्यामुळे ठिकठिकाणी बादल्या लावण्याची नामुष्की मेट्रो प्रशासनावर ओढवली. एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील एमएमआरडीने या मेट्रो प्रकल्पाचे काम केले असून पावसामुळे भ्रष्ट कारभार समोर आला.
कोटय़वधी रुपयांचा खर्च करुन मुंबई महानगरामध्ये विविध मेट्रो प्रकल्पांचे बांधकाम केले जात आहे. मेट्रो 2 ए हा उन्नत मार्गिकेचा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रवासी सेवेत खुला करण्यात आला होता. याच मार्गावरील कांदिवलीतील डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकात मंगळवारच्या मुसळधार पावसात ठिकठिकाणी गळती सुरू झाल्याने बादल्या लावाव्या लागल्या. अंधेरीतील डी. एन. नगर स्थानकातही मेट्रो कर्मचाऱ्यांना बादल्यांची मदत घेऊन पावसाच्या पाण्याचा उपसा करावा लागला. हजारो कोटी रुपये खर्चून उभारलेल्या प्रकल्पांमध्ये जर ही परिस्थिती असेल तर बांधकाम निकृष्ट पद्धतीने केल्याचेच उघड होत आहे, असा दावा नियमित मेट्रो प्रवाशांकडून केला जात आहे. प्रशासनाने तातडीने मेट्रो स्थानकांमध्ये योग्य ती देखभाल-दुरुस्ती करावी आणि पाणी गळती रोखावी, अशी मागणी पर्यावरण कार्यकर्ते झोरू बथेना यांनी केली आहे.
पुणेकरांची मेट्रो बिहारला पळवली, युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
बिहारची निवडणूक तोंडावर असल्याने मतदारांना खूश करण्यासाठी पुण्याची मेट्रो बिहारला पळवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणुकीपूर्वी पाटणा मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रो रेल कॉर्पेरेशनने राजकीय दबावाला बळी पडत पुण्यासाठी राखीव असलेली मेट्रो गाडी तीन वर्षांच्या भाडेकरारावर बिहारला दिल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केला आहे. ही मेट्रो गाडी तात्काळ पुण्यात परत आणली नाही, तर महामेट्रो कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. हा निर्णय घेताना पुण्याचे खासदार, आमदार, पालकमंत्री किंवा नागरी प्रतिनिधीना विश्वासात घेतले का? हा प्रश्न आहे. तसेच भाडेकराराच्या अटी नेमक्या काय आहेत? याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.



























































