एकात्मिक सिग्नलींग प्रणालीच्या चाचणी साठी मेट्रो मार्ग 2अ आणि 7 वर मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेट्रो मार्ग 2अ आणि 7 पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी फेज 1 आणि 2 या दोन्ही मार्गिकांमध्ये एकात्मिक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करणं गरजेचं आहे. या प्रणालीची अंमलबजावणी आणि चाचणी करण्यासाठी सध्या कार्यान्वित असलेल्या पहिल्या टप्प्यांतील सेवा बंद करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी 6 वाजे. पासून रात्री 10 वाजेपर्यंत दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मेट्रो मार्ग 2अ आणि 7 च्या डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान पहिल्या टप्प्यात सुरू असलेली मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध नसेल.

मेगाब्लॉक दरम्यान कामाचे स्वरूप

• पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम, पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीम, सिग्नलिंग आणि टेलिकॉम सिस्टीमसह रोलिंग स्टॉक यांसारख्या सिस्टीमची एकात्मिक चाचणी करणे.

• दुसऱ्या टप्प्यात चाचणी होत असलेल्या तसेच वापरण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रणाली सोबत पहिल्या टप्पा संरेखित करणे.
• प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी संपूर्ण प्रणालीची अखंडता आणि सुरक्षितता तपासणे.

“प्रकल्पाची संपूर्ण स्थापत्य तसेच प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत, लवकरच मेट्रो 2अ आणि 7 चा दुसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, ही मार्गिका पादचारी पुलाद्वारे मेट्रो मार्ग 1 सोबत जोडली गेल्यामुळे रस्त्यावरील रहदारी कमी होईल” अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.