
सामना प्रतिनिधी । मुंबई
कुलाबा-बीकेसी-सिप्झ या मुंबईतील भूयारी मेट्रो मार्गाचे उत्खनन करणारी अजस्त्र टनेल बोअरिंग मशिन (टीबीएम) मरोळच्या पाली मैदान ते आंतरराष्ट्रीय विमातळ दरम्यानचे भूयारीकरणाचे काम पूर्ण करून सोमवारी प्रथमच जमिनीबाहेर आली. मेट्रो तीनच्या कामातील महत्त्वाचा हा क्षण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.
सुमारे 1.26 कि.मी.चे हे अंतर कापण्यास वैनगंगा-1 या टनेल बोअरिंग मशिनला 259 दिवस लागले. मेट्रो-3 मार्गिकेच्या भूयारीकरणास गेल्यावर्षी सुरुवात झाली. सर्वप्रथम माहिमच्या नयानगर येथील मोठय़ा विवरात कृष्णा-1 आणि 2 ‘टीबीएम’ यंत्रे भूगर्भात उतरविण्यात आली. त्यानंतर जानेवारी महिन्यात मरोळ येथील पाली मैदानातील जागेत खोलवर वैनगंगा-1 आणि 2 ‘टीबीएम’ उतरविण्यात आली.
नयानगर येथून सोडलेल्या दोन्ही ‘टीबीएम’ यंत्रांनी शिवसेना भवन (दादर) मेट्रो स्थानकाच्या दिशेने प्रत्येकी 1 कि.मी.च्या पुढे बोगदा पूर्ण केला आहे. पाली मैदानातून आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या 1.26 कि.मी.चे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले.
मेट्रो मुंबईला वरदान ठरणार!
मुंबईकरिता भूयारी मेट्रो वरदान ठरणार आहे. येत्या दोन-तीन वर्षांत एलिवेटेड मेट्रोचे जाळे पूर्ण झाले की मेट्रोचे मार्ग एकमेकांशी जोडले गेल्याने मुंबईतून कुठूनही कुठे एका तासात प्रवास करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. रेल्वे, मेट्रो, मोनो या सर्व सेवांसाठीची एमएमआरडीएची एकात्मिक तिकीट योजना लवकरच नीती आयोगासमोर सादर केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
…आणि तिरंगा फडकला!
वैनगंगा-1 या टनेल बोअरिंग मशिनने 259 दिवसात पाली मैदान, मरोळ ते विमानतळ हे 1.26 कि.मी.चे अंतर कापले आहे. मुंबईच्या भूगर्भात बेसाल्ट, ब्रेशिया तसेच टुफ अशा कठीण खडकांचा बनला असून त्यांना भेद ‘वैनगंगा-1’ हे अजस्त्र्ा टनेल बोअरिंग मशिन मोठा आवाज करीत भूगर्भातून बाहेर आले. त्यावेळी उपस्थितांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.





























































