मेट्रो स्थानकातून बाहेर पडताच प्रवाशांसांठी सायकल, बससेवा, जानेवारीपासून सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेट्रो रेल्वेच्या स्थानकातून बाहेर पडताच प्रवाशांना सायकल आणि बसने त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचता येणार आहे. ही सायकल किंवा बस त्यांना मोबाईल ऍपवरून बुक करता येणार आहे. येत्या जानेवारीपासून मेट्रोच्या ठरावीक स्थानकावरून ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गेल्या जुलै महिन्यात एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यामधील विजेत्या कंपनीकडे ही नवी जबाबदारी सोपवली जाणार आहे. या कंपनीच्या ऍपवरून पुढच्या प्रवासासाठी सायकल किंवा बसचे बुकिंग करता येणार आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्गावर पुढील महिन्यापासून ही सेवा सुरू होणार असून पुढील तीन महिने प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ती कायम केली जाणार आहे. ‘मायबाईक’ या सायकल शेअरिंग ऍपद्वारे प्रायोगिक तत्त्वावर डी. एन. नगर मेट्रो स्थानक येथून सेवा सुरू केली जाणार आहे. बाईकसाठी मासिक 800 रुपये आकारले जाणार आहेत तर सायकल प्रवाशांना घरी घेऊन जाता येईल किंवा मेट्रो स्थानकात पार्क करता येईल.

‘ऑलमाईल्स’ या ऍपद्वारे बस सेवा
‘ऑलमाईल्स’ या ऍपद्वारे बस सेवा सुरू केली जाणार आहे. ती पवईपासून साकीनाका, मरोळ नाका, जागृती नगर आणि घाटकोपर मेट्रो स्थानकापर्यंत असेल. 25 बसेस या सेवेत असतील. त्यातील 10 या वातानुकूलित असतील. या सेवेसाठी पवईतील कंपन्यांशीही करार केले जाणार आहेत. सध्या ही कंपनी हैदराबाद आणि पुणे येथे सेवा पुरवते.