
सामना प्रतिनिधी । पुणे
पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे, तर दुसरीकडे मेट्रो प्रकल्प बाधित नागरिकांकडून मेट्रोला वाढता विरोध पाहायला मिळत आहे. शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा व परिसरातील झोपडपट्टीधारकांनी आहे त्या जागेवर पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. तर, कसबा पेठेतील नागरिकांनी आमच्या इथे मेट्रो स्थानक नकोच अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे सुसाट चाललेले मेट्रोचं गाडं पेठेत अडकण्याची चिन्हं आहेत.
शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या मेट्रोमार्गामुळे झोपडपट्ट्यांसह मध्यवस्तीतील ६८८ कुटुंबे बाधित होत आहेत. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (रिच १) या मेट्रोमार्गावरील राजीव गांधी झोपडपट्टी, कामगार पुतळा झोपडपट्टी आणि तोफखाना झोपडपट्टी, कसबा, बुधवार पेठ, महात्मा फुले मंडई या ठिकाणच्या मुख्यत्वे या बाधित मिळकतींमध्ये समावेश आहे.
झोपडपट्टीधारकांना एसआरए योजनेतील घरे देण्याचा पर्याय सध्या महामेट्रोसह महापालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून सांगितला जात आहे. मात्र, ही घरे खूपच लहान असून लांब आहेत, असे या लोकांचे म्हणणे आहे. अनेक वर्षांपासून आम्ही ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणाहून आमच्या उदरनिर्वाहाची साधने जवळ असल्याने जागेवरच पुनर्वसन आवश्यक असल्याचे सर्वच ठिकाणच्या मेट्रो बाधितांचे म्हणणे आहे. तर कसबा पेठ परिसरातील नागरिकांनी थेट सर्वेक्षण करण्यास मेट्रो अधिकाऱ्यांना मज्जाव केला आहे. त्यामुळे सर्वेक्षण अधिकाऱ्यांना काढता पाय घेत परतावे लागले होते. पेठ परिसरातील नागरिकांनी आमच्या इथे मेट्रो स्थानक नकोच, अशी भूमिका घेतली आहे. यामध्ये मेट्रो अधिकाऱ्यांची शिष्टाईदेखील कामी येत नाहीये.
पेठेमधील नागरिक आणि झोपडपट्टीधारकांमध्ये पुनर्वसनासंबंधी सध्या संभ्रम आहे. आपल्या जाणाऱ्या घराबदल्यात मोबदला कसा, किती आणि कशा स्वरूपात मिळणार या चिंतेने बाधितांना ग्रासले आहे. त्यामुळे बाधितांमध्ये मेट्रोविरोधात असंतोषाचे वातावरण आहे. याबाबत मेट्रोने लवकरच बाधितांशी संवाद साधून मार्ग न काढल्यास प्रकल्पाला अधिक तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.
































































