
मेट्रो लाईन 2 अ प्रोजेक्ट अंतर्गत मेट्रो रेल्वेच्या इमर्जन्सी बॅकअपसाठी असलेल्या जनरेटरच्या बॅटरी चोरणाऱयाला एमएचबी पोलिसांनी अटक केली. राजा ऊर्फ राजेंद्र प्रकाश जाधव असे त्याचे नाव आहे. त्याने एकूण 5 बॅटऱया आणि स्वातंत्रदिनाच्या रोषणाईसाठी लावलेले फोकस चोरल्याचे तपासात समोर आले आहे.
एमएमआरडीएच्या वतीने शहरात मेट्रोचे जाळे पसरवले जात आहे. उपनगरात डी. एन. नगर ते दहिसर प्रोजेक्ट 2 अ ची सेवा सुरु झाली आहे. दहिसरच्या आनंदनगर आणि मंडपेश्वर स्थानकात मेट्रोच्या इमर्जन्सी बॅकअपसाठी जनरेटर बसवण्यात आले आहेत. मे महिन्यात आनंदनगर स्थानकातील जनरेटरच्या बॅटरी चोरीला गेल्याची तक्रार एमएचबी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तेथे चोरीची घटना घडल्यानंतर मंडपेश्वर स्थानकातदेखील बॅटरी चोरीला गेल्याने त्याची दखल घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या पथकातील उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून राजेंद्रला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने बॅटरी आणि मंडपेश्वर स्थानकात रोषणाईसाठी लावलेले फोकस चोरल्याचे सांगितले.चोरीच्या बॅटरी त्याने एका भंगार विक्रेत्याला विकल्या होत्या. त्या भंगार विक्रेत्यानेदेखील त्या बॅटरी दुसऱया व्यक्तीला विकल्याचे तपासात समोर आले.
लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने बनला चोर
राजेंद्र हा पूर्वी इलेक्ट्रिकचे काम करायचा. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर तो चोऱया करू लागला. चोरीच्या गुह्यात राजेंद्रला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


























































