मेट्रोत तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी ऐन गर्दीत प्रवासी त्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱया मुंबई मेट्रोच्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रोची सेवा ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळी विस्कळीत झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. हा बिघाड तातडीने दुरुस्त करण्यात आल्याने ही सेवा लागलीच वेळेवर आली.

मुंबई मेट्रो वनच्या विमानतळ मार्ग स्थानकावर मेट्रोच्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना उतरवण्यात आले. ‘मुंबई मेट्रो वन’ प्रशासनाने तातडीने ही गाडी सेवेतून बाहेर काढून सेवा सुरळीत केली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांना जोडणाऱया मुंबई मेट्रो वनमुळे घाटकोपरवरून आणि अंधेरीवरून गाडी बदलून जाणाऱया प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या घाटकोपर आणि पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकांत प्रवाशांच्या गर्दीत गेली काही वर्षे सातत्याने वाढच होत आहे.