मेट्रोच्या स्थानकांवर भाड्याने सायकली, कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा  एमएमआरडीएचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई शहरात मेट्रोच्या वाढत्या जाळ्याचा वापर करून रस्त्यांवरील वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रोच्या स्थानकांवर प्रवाशांसाठी भाड्याने सायकली उपलब्ध करण्याची योजना आहे.

येत्या तीन ते चार वर्षांत मुंबई शहरात 270 किमीचे मेट्रोचे जाळे पसरले जात असून त्यामुळे 40 लाख प्रवाशांची सोय होणार आहे. त्यामुळे रेल्वेचे प्रवासीही मेट्रोकडे वळणार असून रस्त्यावरील मोटारीही कमी होणार आहेत. त्यामुळे कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यास मेट्रो हातभार लावणार आहे.

मुंबईत सध्या पहिल्या भुयारी मेट्रोचे काम कुलाबा ते सिप्झ या मार्गावर सुरू आहे. ही मेट्रो तीनची कामे वेगात सुरू असली तरी तिच्या आधी मेट्रो 2-ब आणि मेट्रो-7  सुरू होण्याची शक्यता आहे. दहाहून अधिक मेट्रोचे मार्ग मंजूर झाले असून चार मार्गांचे काम वेगाने सुरू आहे. या मेट्रोची मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील स्थानकांशी जोडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मुंबईच्या या टोकाकडून त्या टोकाकडे तासभरात प्रवास करणे शक्य होणार आहे.

मेट्रोच्या विविध मार्गांवरील स्थानकांत प्रवाशांना भाड्याने सायकली पुरविण्याची योजना आहे. त्यासाठी विविध कंपन्यांना टेंडर काढून सायकली पार्क करण्यासाठी जागा देण्याची योजना असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले. प्रवासी भाडे भरून सायकली आपल्या कामाच्या नियोजनाप्रमाणे घेऊन जातील आणि काम झाले की पुन्हा परत करतील अशी योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुचाकी  भाड्याने  देण्याची योजना

गोव्याला ज्याप्रमाणे पर्यटकांना भाड्याने मोटरसायकली मिळतात त्याच धर्तीवर मुंबईतही मोटरसायकली काही तासांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव आहे; परंतु मुंबईतील मोटरसायकलींची वाढती संख्या पाहता या प्रस्तावाला मंजुरी मिळते की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला आला होता. चेन्नईतही मोटरसायकल भाड्याने देण्याची योजना कार्यरत आहे. एक ते दोन किलोमीटर अंतरावरील कामे करून ही मोटरसायकल पुन्हा परत त्याच जागी आणून दिली जाते.