
सामना ऑनलाईन, मुंबई
मेट्रो रेल्वेमुळे ट्रफिकला अडथळा नको, किंबहुना मेट्रोखालूनच वाहनेही जातील अशी दूरदृष्टी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठेवली आहे. ‘मेट्रो-4’ आणि ‘मेट्रो-9’ प्रकल्पाबरोबरच पाच उड्डाणपूलही बांधले जाणार आहेत. हे उड्डाणपूल मेट्रो लाइनच्या खालीच असतील. वरून मेट्रो रेल्वे धावेल आणि त्याच खालील उड्डाणपुलावरून वाहनेही धावू शकतील.
या प्रकल्पांसाठी 6600 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून हा निधी एमएमआरडीएला दिला जाणार आहे. त्यासाठी लवकरच निविदा मागवल्या जातील अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी-कांजुरमार्ग या ‘मेट्रो-6’ मार्गावरही असेच उड्डाणपूल उभारले जाणार आहेत.
असा असेल मार्ग आणि उड्डाणपूल
- ‘मेट्रो-4’ प्रकल्प वडाळा ते कासारवडवली असा आहे तर ‘मेट्रो-9’ ही दहिसर ते मीरा-भाईंदर या मार्गावर धावणार आहे.
- ‘मेट्रो-4’ प्रकल्पादरम्यान तीन उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. ते भाईंदर पाडा, कासारवडवली आणि घोडबंदरजवळील आनंदनगर येथे उभारले जातील.
- ‘मेट्रो-9’ प्रकल्पादरम्यान ठाणे आणि कासारवडवली येथे असे उड्डाणपूल उभारले जाणार आहेत.
- ‘मेट्रो-4’ आणि ‘मेट्रो-9’ प्रकल्पाबरोबरच पाच उड्डाणपूल उभारणार
- 6600 कोटी रुपये खर्च करणार























































