
आशिया व आफ्रिकेतील काही देशांत क्रांती घडवणारी जेन-झी आंदोलनाची लाट आता जगभर पसरली आहे. मेक्सिकोमध्ये भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीच्या विरोधात आज हजारो तरुण रस्त्यावर उतरले. हातोडे, लाठय़ाकाठय़ा, दगड, रॉड हातात घेऊन त्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर चाल केली. पोलिसांवर हल्ला केला. त्यात पोलिसांसह 120 हून अधिक लोक जखमी झाले.
मेक्सिकोमध्ये ड्रग्जचा व्यापार करणाऱयांचे अनेक गट आहेत. या गटातील गँगवारमुळे देशात सतत गुन्हे घडत असतात. अनेक हत्या होतात. मागील वर्षी सत्तेत आलेल्या क्लॉडिया शिनबौम यांच्याकडून लोकांची मोठी अपेक्षा होती, मात्र त्यांचे सरकार देशातील कायदा-सुव्यवस्था राखण्यात व सर्वसामान्यांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरल्याचा जनतेचा आरोप आहे. त्यातूनच तरुण रस्त्यावर उतरले. या तरुणांना सरकारविरोधी राजकीय पक्षांसह मध्यमवयीन व वृद्ध नागरिकांचीही साथ लाभली. त्यामुळे राजधानीसह इतर राज्यांतही उग्र निदर्शने सुरू झाली. आंदोलकांपैकी 20 जणांना अटक करण्यात आली आहे.
कशामुळे पडली ठिणगी?
मेक्सिकोमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक मोठय़ा लोकांच्या हत्या झाल्या आहेत. सत्ताधारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे लोकांमध्ये असंतोष खदखदत होता. मिशोकान राज्यातील उरुपन शहराचे महापौर कार्लोस अर्ल्बटो मान्जो रॉड्रिग्ज यांच्या हत्येमुळे हा असंतोष उफाळून आला आणि तरुण रस्त्यावर उतरले. कार्लोस मान्जो यांनी ड्रग्ज तस्करांविरोधात मोहीम उघडल्यानेच त्यांची हत्या झाल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.




























































