
सामना ऑनलाईन, मुंबई
राज्यातील गरीब मध्यमवर्गीयांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार करणाऱया म्हाडाच्या मुख्यालयाची दिवसेंदिवस होत असलेली पडझड लक्षात घेऊन वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या गृहनिर्माण भवनाची संपूर्ण इमारत पाडून कॉर्पोरेट लूक असलेली 16 मजली इमारत बांधण्याची योजना आखण्यात येत आहे. त्यामुळे नवीन टॉवरमधून म्हाडाचा कारभार गतिमान होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
म्हाडाचा कारभार सध्या वांद्रे येथील गृहनिर्माण भवन या पाच मजली इमारतीमधून चालवला जातो. सुमारे 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ही इमारत जुनी झाली आहे. काही ठिकाणी टेकू लावले आहेत तर अनेक कार्यालयांतील प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. म्हाडाच्या सचिवांच्या ऑफिसमधील छताचा भाग आजही तुटलेला आहे. मध्यंतरी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यानंतर पहिल्या टप्प्यात या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली, पण मुंबईतल्या खाऱया हवेमुळे इमारत लवकर खराब होते. दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा सध्याची इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची योजना पुढे आली आहे.
म्हाडाच्या कामाचा आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाला आहे. सध्या प्राधिकरणाचे कामकाज चालवण्यासाठी दोन ऑफिस उपलब्ध करून दिली आहेत. भविष्यात प्राधिकरणाचे काम वाढणार आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे कामही याच इमारतीतून सुरू आहे. त्याशिवाय मुंबई झोपडपट्टी मंडळाच्या वित्त विभागाचे कार्यालय आहे. जागतिक बँकेच्या कार्यालयाला गच्चीत मागील 30 वर्षांपासून तात्पुरते कार्यालय दिले आहे. वाढत्या गरजा लक्षात घेऊन नवीन इमारत बांधण्याची योजना आहे.
300 कोटींचा खर्च
म्हाडाकडे एफएसआय शिल्लक आहे. त्यातून 16 मजली इमारत बांधता येईल असा प्राथमिक अंदाज आहे. म्हाडाच्या मुख्य आर्किटेक्टने नव्या इमारतीचा प्लॅनही तयार केला आहे. सुमारे 300 कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत बांधण्याची योजना असल्याचे गृहनिर्माण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱयाने सांगितले.
आकर्षक इमारतीसाठी खासगी आर्किटेककडून टेंडर
नवीन बांधकामाचा प्लॅन तयार केला असला तरी अधिक आकर्षक इमारत बांधण्यासाठी खासगी आर्किटेक्टकडून प्लॅन तयार करण्याचा म्हाडाचा विचार आहे. कारण म्हाडाच्या मुख्यालयाच्या आसपास नवीन लूकचे टॉवर तयार झाले आहेत. त्याच धर्तीवर म्हाडाच्या गृहनिर्माण भवनालाही चांगला कॉर्पोरट लूक देण्यासाठी व वाढीव एफएसआयचा उपयोग करून 16 किंवा त्यापेक्षा अधिक उंच इमारत बांधण्याची योजना आहे. खासगी आर्किटेक्टकडून त्यासाठी टेंडर मागवण्यात येतील.
कार्यालये भाडय़ाने
नवीन इमारत बांधल्यावर उपलब्ध होणारी अतिरिक्त ऑफिसेस सरकारी संस्थांना भाडय़ाने देण्याची योजना आहे. त्यातून म्हाडाला उत्पन्नही मिळेल. सध्या म्हाडाच्या मुख्यालयात एका राष्ट्रीयीकृत बँकेसह एलआयसीला जागा भाडय़ाने दिली आहे. त्याशिवाय दोन-तीन महामंडळांना, जिल्हाधिकारी कार्यालयाला जागा भाडय़ाने दिली आहे. नवीन इमारतीतील प्रशस्त जागेतून म्हाडाचा कारभार चालविण्याची योजना आहे.






























































