
मुंबईतल्या चिरा बाजार येथे बुधवारी पहाटे पहिल्या मजल्याचा एक भाग कोसळून दोन ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. जखमींपैकी एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या व्यक्तीने रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.बुधवारी सकाळी सुमारे 6:20 वाजता जे.एस.एस. रोडवरील म्हाडा आत्माराम इमारतीचा काही भाग कोसळला.
पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक 11 मधील स्वयंपाकघराचा भाग खाली कोसळून तो भूतलावर आदळला. मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, म्हाडा, रुग्णवाहिका पथक आणि बीएमसीच्या ‘सी’ वॉर्डचे कर्मचारी घटनास्थळी धावले. या घटनेत त्या खोलीत राहणारे दोन ज्येष्ठ नागरिक जखमी झाले.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी रहिवासी ठक्करजी गाला (75) आणि गुणवंती गाला (71) यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र ठक्करजी यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला, तर गुणवंती यांना उपचारासाठी भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.