
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून उद्या, रविवारीदेखील ही मोहीम सुरू राहणार आहे. याअंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱयांनी आपापल्या विभागाची स्वच्छता तर केलीच याशिवाय वर्षानुवर्षे अडगळीत पडलेल्या फायलींचे ढीग बाहेर काढून त्यांच्या आवश्यकतेनुसार वर्गीकरण केले. या मोहिमेत एक लाखाहून अधिक फायलींचे वर्गीकरण करण्यात आले असून त्यातील अनावश्यक फायली आणि कागदपत्रे नष्ट करण्यात येणार आहेत. या कामासाठी म्हाडा कर्मचाऱयांना पाचशेहून अधिक मजूर, सफाई कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयाची इमारत पाच मजली असून यात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. म्हाडा मुख्यालयात अनेक फायलींचे आणि कागदपत्रांचे ढीग वर्षानुवर्षे पडलेले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह विविध कामानिमित्त येणाऱया नागरिकांनाही अडचण होते. या पार्श्वभूमीवर ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार म्हाडामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवारी सुट्टीच्या दिवशीदेखील सुमारे 700 अधिकारी-कर्मचारी उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभागी झाले. रविवारीदेखील ही मोहीम सुरू राहणार आहे. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी शनिवारी स्वतः म्हाडा मुख्यालयातील प्रत्येक कार्यालयातील कामकाजाची सुमारे तीन तास पाहणी करीत आढावा घेतला. या पाहणीदरम्यान संबंधित कर्मचाऱयांना कार्यालयामधील संगणक, टेबल, खुर्च्या, कपाटे आदी जुन्या व निरुपयोगी जड वस्तूंची विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले. कार्यालयात तसेच कार्यालयाबाहेरील मोकळय़ा जागेत अडचण निर्माण करणारे व निकामी झालेले फर्निचर व इतर अनावश्यक वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
फायलींचे वर्गीकरण करून स्पॅनिंग करणार
स्वच्छता मोहिमेत कार्यालयातील फायलींचे आणि कागदपत्रांचे ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे वर्गीकरण करण्यात येत आहे. त्यातील ‘ड’ वर्गातील कागदपत्र नष्ट करण्यात येणार आहेत. वर्गीकरण झाल्यानंतर फायली आणि कागदपत्रे गोडाऊनमध्ये ठेवली जाणार आहेत. त्यातील प्रत्येक कागदपत्राची नोंद संबंधित कार्यालय प्रमुखाकडे असणार आहे. म्हाडाचा कारभार पेपरलेस करण्याच्या दृष्टीने या सर्व फायलींचे स्पॅनिंग केले जाणार आहे. जेणेकरून आवश्यकतेनुसार कर्मचाऱयांना त्या फायली झटपट मागवता येतील, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.