
वर्षानुवर्षे मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्रक्रिया म्हाडाकडून सुरू आहे. या कामाला आणखी गती देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱया संस्थांच्या नियुक्तीसाठी झोननुसार निविदा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे शहरातील अतिधोकादायक इमारतींचे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.
मुंबईत सध्या 13 हजारांहून अधिक उपकरप्राप्त इमारती असून त्या 80 ते 100 वर्षे जुन्या आहेत. या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून केली जाते. यातील काही इमारती दुरुस्तीच्या पलीकडे गेल्या आहेत. अतिधोकादायक इमारतींची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्विकास केल्यास इमारत कोसळण्याच्या घटना कमी होऊन जीवित व वित्तहानी रोखता येणे शक्य होईल. ही बाब लक्षात घेऊन म्हाडाकडून गेल्या वर्षीपासून उपकरप्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू आहे, मात्र म्हाडाने आता एकाच वेळी सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित उपकरप्राप्त इमारतींचे चार विभाग असून त्याचे वर्षभरात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी चार एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे वेळेत सदरचे ऑडिट पूर्ण करून येणाऱया अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
178 इमारती अतिधोकादायक
म्हाडाने आतापर्यंत 1500 इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण केले असून त्यामध्ये जवळपास 178 इमारती सी-1 म्हणजेच अतिधोकादायक असल्याचे आढळले आहे.
40 कोटी रुपयांचा खर्च
म्हाडाने 12 हजार 500 सेस इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी जवळपास 40 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान एका इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी 20 ते 90 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. इमारतीचा आकार, उंची किती आहे त्यावर ऑडिटचा खर्च अवलंबून असणार आहे.

























































