‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील घरे महागणार; वाढीव रेडीरेकनर, देखभाल खर्चाचा फटका बसणार

म्हाडाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेतील मुंबईतील सव्वाशे घरांसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. मात्र, वाढीव रेडीरेकनर आणि देखभाल खर्चाचा या घरांच्या किमतीत समावेश केला जाणार असल्यामुळे या घरांच्या किमतीत वाढ होणार आहे. आधीच कोट्यवधींची ही घरे विक्रीविना धूळ खात पडली आहेत, त्यातच या घरांच्या किमतीत आणखी वाढ झाल्यामुळे या योजनेला अर्जदारांचा कसा प्रतिसाद मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

म्हाडाच्या मुंबईतील घरांवर अर्जदारांच्या उड्या पडतात. परंतु दोन वेळा सोडतीत समावेश करूनदेखील पवई, ताडदेव, जुहू, लोअर परळ येथील म्हाडाची काही घरे विक्रीविना धूळ खात पडली आहेत. या घरांच्या किमती कोट्यवधींच्या घरात असल्यामुळे त्यांची विक्री झालेली नाही. अशा सुमारे सव्वाशे घरांची लॉटरीशिवाय म्हणजेच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर विक्री करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. गेल्या काही वर्षांत रेडीरेकनरच्या दरात वाढ झाली आहे. शिवाय या घरांचा देखभाल खर्च म्हाडाने आपल्या तिजोरीतून भरला आहे. त्यामुळे या खर्चाचा समावेश घरांच्या किमतीत केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

84 दुकानांच्या लिलावास मुदतवाढ

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील 84 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला 2 फेब्रुवारी रोजी रात्री 11.59 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. या लिलावात मुंबईतील मुलुंड गव्हाणपाडा येथे 4, कुर्ला- स्वदेशी मिल येथे 5, कोपरी पवई येथे 15, मॉडेल टाऊन मजासवाडी जोगेश्वरी पूर्व येथे 1, सिद्धार्थ नगर गोरेगाव येथे 1, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व येथे 17 , मालवणी मालाड येथे 29 तसेच चारकोप येथे 12 दुकाने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

MHADA Mumbai Flats to Get Costlier Under First-Come-First-Served Scheme

MHADA’s ‘First-Come-First-Served’ scheme flats in Mumbai to see price hike due to increased ready reckoner rates and maintenance costs. Check shop auction details.