
म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील घरांच्या विक्रीसाठी येत्या मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीमधील 4186 घरांसाठी 2,15,965 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत.
पुणे मंडळातर्फे सोडतीसाठी 11 सप्टेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. पुणे, पिपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 3322 घरांचा आणि 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 864 घरांचा सोडतीत समावेश आहे. अर्जदारांच्या विनंतीनुसार, काही तांत्रिक अडचणी व निवडणूक आचारसंहिता या कारणांमुळे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. अर्जदारांना ऑनलाईन थेट घरबसल्यादेखील सोडत बघता येणार आहे.
आज म्हाडाचा लोकशाही दिन
म्हाडाचा लोकशाही दिन उद्या, सोमवारी दुपारी 12 वाजल्यापासून ‘म्हाडा’च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात चौथ्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकशाही दिन पार पडणार आहे. लोकशाही दिना अंतर्गत नागरिकांच्या प्राप्त तक्रारी अर्जांवर संबंधित अधिकाऱयांच्या उपस्थितीत थेट व खुली चर्चा केली जाते. यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात येतात. लोकशाही दिनासाठी नमुना अर्ज म्हाडाच्या https://mhada.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

























































