
अंधेरी पूनमनगर येथील धोकादायक पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. म्हाडामार्फत या वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार असून आठवडय़ाभरात करारनामा करून 15 फेब्रुवारीपासून रहिवाशांना घरभाडे सुरू केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अंधेरी पूनमनगर येथील पीएमजीपी वसाहतीत चार मजली 17 इमारती असून त्यात 942 निवासी तर 42 अनिवासी गाळे आहेत. 30 वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारती धोकादायक अवस्थेत असून वारंवार येथे स्लॅब कोसळून रहिवाशी जखमी होण्याच्या घटना घडतात. शिवसेनेच्या प्रयत्नामुळे म्हाडाच्या माध्यमातून या वसाहतींचा पुनर्विकास होणार आहे. या ठिकाणी 17 मजली 10 विंग बांधण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.
सोमवारपासून म्हाडाचे अधिकारी वसाहतीत जाऊन घरात कोण वास्तव्यास आहे, शेअर सर्टिफिकेट कोणाच्या नावावर आहे याची पाहणी करणार आहे. करारनाम्यासाठी रहिवाशांनी कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत याबाबत मार्गदर्शन तसेच पुनर्विकासाबाबत रहिवाशांच्या असलेल्या शंकांचेदेखील निरसन केले जाईल, असे म्हाडाच्या अधिकाऱयाने सांगितले.
एकत्रित भाडे मिळणार
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना म्हाडाकडून 15 फेब्रुवारीपासून भाडे सुरू केले जाईल. रहिवाशांना दरमहा 20 हजार याप्रमाणे सुरुवातील तीन महिन्यांचे एकत्रित भाडे दिले जाईल. रहिवाशाने घर रिक्त केल्यानंतर 33 महिन्यांचे एकत्रित भाडे दिले जाईल. रहिवाशांना म्हाडाकडून शिफ्टिंग चार्जदेखील दिला जाईल, असेही अधिकाऱयाने सांगितले.
म्हाडाच्या भूमिकेकडे रहिवाशांचे लक्ष
वरळी बीडीडीच्या धर्तीवर पुनर्विकासात 450 ऐवजी 500 चौरस फुटाचे घर द्यावे, पुनर्विकास होईपर्यंत दरमहा 25 हजार रुपये भाडे देण्यात यावे, दोन ते तीन मजली भूमिगत वाहनतळ उभारावे, ट्रान्सफर शुल्क रद्द करावे, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. या मागण्यांवर म्हाडा काय निर्णय घेणार, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.


























































