
‘लॉटरीशिवाय म्हाडाचे घर घेण्याची संधी…’, ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ असा मोठा गाजावाजा करत म्हाडाने मुंबईतील 118 घरांसाठी मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध केली; परंतु घरांच्या कोटय़वधींच्या किमती पाहून सर्वसामान्यांची घोर निराशा झाली आहे. सर्वसामान्यांना परवडतील अशा जेमतेम 30 घरांचा या योजनेत समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, म्हाडाच्या काही घरांच्या किमती तर ‘मार्पेट रेट’पेक्षा जास्त असल्याने ही घरे विकली जाणार की पुन्हा धूळ खात पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन वेळा सोडतीत समावेश करूनही विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या घरांचा ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेत समावेश आहे. https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. सर्वात कमी किमतीचे घर पीएमजीपी कॉलनी, मानखुर्द येथे असून या घराची किंमत 31 लाख रुपये आहे तर सर्वात महागडे घर ताडदेव क्रिसेंट टॉवरमध्ये असून या घराची किंमत आठ कोटी रुपये आहे. अर्जदाराला योजनेनुसार एक लाख रुपयांपासून ते सहा लाख रुपयांपर्यंत अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
मेंटेनन्सचा भुर्दंड अर्जदारांवर
अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या घरांचा देखभाल खर्च म्हाडाने आपल्या तिजोरीतून भरला आहे. या खर्चाचा समावेश घरांच्या किमतीत करण्यात आल्यामुळे या योजनेतील घरांच्या किमती वाढल्या आहेत.
घराच्या विक्रीसाठी पाच वर्षांची अट
म्हाडाच्या लॉटरीतील विजेत्यांना नियमानुसार पाच वर्षे घराची विक्री करता येत नाही. त्याचप्रमाणे ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेतील विजेत्यांनाही घराच्या विक्रीसाठी पाच वर्षांची अट घातली आहे. तसेच अर्जदारांना डोमेसाईल प्रमाणपत्रदेखील बंधनकारक असणार आहे.































































