आज म्हाडा कोकण मंडळाच्या 5354 घरांसाठी सोडत

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे आणि वसई जिह्यातील 5354 घरांच्या आणि ओरोस (सिंधुदुर्ग), पुळगाव (बदलापूर) येथील 77 भूखंडांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत शनिवारी सकाळी 11 वाजता ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात काढण्यात येणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होणार का, याकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या या सोडतीसाठी एकूण 1,84,994 अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह 1,58,424 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील सर्वाधिक अर्ज खासगी बिल्डरांकडून म्हाडाला मिळालेल्या म्हणजेच 20 टक्के योजनेतील घरांसाठी आले आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली येथे असलेल्या या योजनेतील 565 घरांसाठी तब्बल 1 लाख 46 हजार 432 अर्ज आले आहेत. सानपाडा डीपीव्हीजी व्हेंचर्स येथील अत्यल्प उत्पन्न गटाच्या दोन घरांसाठी तब्बल 6156 अर्ज तर येथीलच अल्प उत्पन्न गटाच्या 17 घरांसाठी 18 हजार 227 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत.

घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा

n कार्यक्रम स्थळी उपस्थित अर्जदारांना निकाल पाहता यावा, याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.

n अर्जदारांना ’वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून https://youtube.com/live/K9bX1SXAESQ?feature=share या लिंकवर व म्हाडाच्या अधिपृत फेसबुक आणि यूटय़ूब पेजवर सोडतीचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

n विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या वेबसाईटवर सायंकाळी 6 नंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतचा संदेश प्राप्त होणार आहे.