
सामना ऑनलाईन, मुंबई
एकुलता एक मुलगा मन्मथ याने केलेल्या आत्महत्येमुळे उध्वस्त झालेल्या म्हैसकर दांपत्याच्या घरी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे. या दांपत्याला सरोगसीद्वारे दोन मुली झाल्या आहेत. शुक्रवारी या दोन छोट्या पाहुण्या म्हैसकर कुटुंबियांच्या घरात प्रवेश करणार आहेत. मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तर मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव आहेत.
म्हैसकर दांपत्याला २० वर्षांचा मन्मथ नावाचा मुलगा होता. जुलै महिन्यात त्याने दक्षिण मुंबईतील एका इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली होती. या आत्महत्येमुळे फक्त म्हैसकर दांपत्यच नाही तर राज्यातील सगळे पालक हादरले होते. मुलाच्या जाण्याच्या दुखा:वर मात करीत या दांपत्याने पुन्हा एकदा अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करायचं ठरवलं होतं. देवाची कृपा आणि सगळ्यांच्या आशिर्वादाने आम्हाला हा दिवस बघायला मिळाल्याची प्रतिक्रिया या दांपत्याकडून मिळाली आहे.

























































