जगातील सर्वात उंच शिखराला धोका, एव्हरेस्टच्या बाल्कनीत सापडले मायक्रोप्लॅस्टिक

जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवरील धोका वाढला आहे. हा धोका मानवनिर्मित आहे. एव्हरेस्टच्या शिखराच्या काही मीटर खाली वैज्ञानिकांना मायक्रोप्लॅस्टिक सापडले आहे. मायक्रोप्लॅस्टिकच्या कचऱयामुळे एव्हरेस्टवरील बर्फ आणि पृष्ठभागाचे नुकसान झाले आहे.

माऊंट एव्हरेस्टची उंची 8 हजार 848 मीटर म्हणजे 29 हजार 20 फूट उंची आहे. शिखराच्या 400 मीटर खाली मायक्रोप्लॅस्टिक कचरा आढळला असून तो बर्फात मिसळलेला आहे. ज्या जागेवर हा कचरा आढळला, त्याला एव्हरेस्टची ’बाल्कनी’ असे म्हणतात. शास्त्र्ाज्ञांना हा कचरा 5300 मीटरपासून 8440 मीटर उंचीपर्यंत 11 ठिकाणी सापडला. यातील सर्व ठिकाणी मायक्रोप्लॅस्टिक आढळले आहेत.

’द गार्जियन’मध्ये प्रकाशित अहवालानुसार, एव्हरेस्टच्या बेस कॅम्पजवळ प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. गिर्यारोहकांचा तिथे सर्वात जास्त वावर असतो. गिर्यारोहकांकडून वापरल्या जाणाऱया कापड, तंबू आणि दोऱयांमध्ये फायबरचा वापर होतो. अनेकदा गिर्यारोहकांचे सामान तिथेच राहते. स्विप्स एल्प्स आणि फ्रेंच पायरेनीस पर्वतांवरसुद्धा मायक्रोप्लॅस्टिक सापडले आहेत. हवेने उडूनही ते तिथपर्यंत येऊ शकतात, असं अभ्यासकांना वाटतंय.

संशोधक इमोजन नॅपर यांच्या मते, टाकाऊ प्लॅस्टिकपासून मायक्रोप्लॅस्टिक तयार होत असल्याने याचा वापर कमी करणे किंवा पुनर्वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. हे सिंथेटिक फायबरपासून बनवलेल्या कापडापासूनही निघते. यामुळे सुती कापडाचा वापर केला पाहिजे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

– 2019 साली 880 लोकांनी एव्हरेस्ट सर केला होता. शास्त्र्ाज्ञांचे सर्व गिर्यारोहकांना सांगणे आहे की, असा तंबू किंवा कापड वापरा, ज्याचे धागे तुटणार नाही. बॅग फाटणार नाही. मायक्रोप्लॅस्टिक कचऱयावर हा एकच उपाय आहे.

– नॅशनल जिओग्राफीक एक्सपेडिशनने 2019 साली एव्हरेस्टवर पडलेल्या नमुन्यांचा अभ्यास केला. एव्हरेस्टवरील बर्फ वितळून जे एक लीटर पाणी तयार झाले, त्यामध्ये 30 मायक्रोस्कोपिक प्लॅस्टिकचे कण होते तर सर्वाधिक प्रदूषित पाण्यात 119 मायक्रोस्कोपिक प्लॅस्टिक कण होते.

आपली प्रतिक्रिया द्या