
राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाच्या विकासासाठी राज्याच्या उद्योग विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या उद्योगांना सुलभ वित्त पुरवठा व विकास करण्यासाठी सीडबी या संस्थेसोबत राज्य सरकारने बुधवारी सामंजस्य करार केला.
या कराराकर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱया करण्यात आल्या. उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व सीडबीच्या वतीने उपव्यवस्थापकीय संचालक व्ही.एस.व्ही राक यांनी स्वाक्षरी केली. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी उपस्थित होते.
या समंजस्य करारांतर्गत सिडबीमार्फत उद्योग विभागात एक प्रकल्प व्यवस्थापन घटक स्थापन करण्यात येईल. त्याच्या माध्यमातून या उद्योगांसाठी विविध योजना, कार्यक्रम आखणी करण्यात येईल. तसेच सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांना भाग भांडकल सहाय्य, व्याज अनुदान, आजारी पडण्याच्या मार्गावर उपक्रमांना सहाय्य, तसेच उपक्रमांचे मूल्यमापन करुन आवश्यकतेनुसार सहाय्य करण्यात येईल. तसेच राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विद्यमान योजना, कार्यक्रमांचा अभ्यास
करून या उपक्रमांची गुणवत्ता वाढावी व त्यांच्या अडी अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने सध्याच्या
योजना, कार्यक्रमात आवश्यकता असल्यास प्रकल्प व्यवस्थापन घटकाकडून सुधारणा सुचविण्यात येतील असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विकासाकरीता पूरक वातावरण निर्माण करून या उद्योगांना बळकटी देण्याची सीडबीची योजना आहे.


























































