
मायक्रोसॉफ्ट या टेक जायंट कंपनीने मागील दोन वर्षांत जवळ जवळ 9 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. यामध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये 25 वर्षे समर्पित सेवा देणाऱ्या क्रिस बायमन यांचाही समावेश आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये कस्टमर सक्सेस अकाऊंट मॅनेजमेंटमध्ये दीर्घकाळ काम केलेल्या क्रिस बायमन यांनी लिंक्डइनवर एक हृदयस्पर्शी पोस्टमध्ये आपला वैयक्तिक अनुभव शेअर केला.
लिंक्डइनवर क्रिस बायमन यांनी लिहिलेय की, ‘मे महिन्यात मी एक मोठा टप्पा गाठला. मायक्रोसॉफ्टमध्ये 25 वर्षे समर्पित सेवा. काही आठवडय़ांनंतर मला माझ्या संपूर्ण टीमसह नोकरीवरून काढून टाकण्यात आले.’ हा अनुभव कडू गोड असल्याचे वर्णन क्रिस बायसनने केले. सहकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून भविष्यात नवीन संधी शोधण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. मायक्रोसॉफ्टमधील नव्या नोकरकपातीचा फटका अनेक विभागांना बसला आहे. मायक्रोसॉफ्टच्या रेडमंड, वॉशिंग्टन मुख्यालयातील 830 कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम झाला. नोकरकपातीचा परिणाम किती कर्मचाऱ्यांवर झाला, याची आकडेवारी कंपनीने दिलेली नाही. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत ही कपात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुमारे 4 टक्के आहे, यास दुजोरा दिला.