
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर प्रणालीतील बिघाडामुळे जवळपास सर्वच देशांतील विविध सेवा ठप्प झाल्या. आंतरराष्ट्रीय विमानसेवेपासून बँकिंग सेवांना मोठा फटका बसला. तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगती करण्यात मागे राहिल्याचा मोठा फटका अनेक देशांना बसला. यात चीनने मात्र स्वतःची भक्कम ताकद दाखवून दिली. तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वावलंबनाच्या जोरावर चीन भक्कमपणे उभा असल्यामुळे मायक्रोसॉफ्ट गोंधळात इतर देशांइतका मोठा फटका चीनला बसला नाही.
चीनमधील पायाभूत सुविधा, विमान कंपन्यांपासून ते बँकिंगपर्यंतच्या विविध सेवा मायक्रोसॉफ्ट गोंधळात अजिबात कोलमडल्या नाहीत. तेथील उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. याबाबत चीनमधील नागरिकांनीही स्वतःच्या देशाबद्दल अभिमान व्यक्त करीत सोशल मीडियामध्ये तशा पोस्ट शेअर केल्या आहेत. चीनमधील परदेशी व्यवसाय आणि हॉटेल्स व्यवसायावर मात्र मायक्रोसॉफ्ट प्रणालीतील बिघाडामुळे झालेल्या गोंधळाचा परिणाम दिसून आला.
स्थानिक वेळेनुसार, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चीनच्या मुख्य भूभागात मायक्रोसॉफ्ट सर्व्हर प्रणाली बिघाडाचा विपरीत परिणाम झाल्याचे वृत्त नव्हते. बीजिंग आणि शांघाय येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील विमानसेवा वेळापत्रकानुसारच सामान्यपणे सुरळीत सुरू होती.
याचवेळी दुसरीकडे हाँगकाँग ते ऑस्ट्रेलियापर्यंत आशिया-पॅसिफिक प्रदेशातील अनेक विमानतळांना मायक्रोसॉफ्ट सर्व्हर प्रणाली बिघाडामुळे मोठ्या परिणामाला तोंड द्यावे लागले. याचदरम्यान तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबन सिद्ध केलेल्या चीनची कामगिरी जवळपास सर्वच देशांमध्ये कौतुकाचा विषय बनली आहे.
मायक्रोसॉफ्ट सर्व्हर प्रणालीतील बिघाडाचा हिंदुस्थान पाकिस्तान नेपाळ या देशांनाही विविध अडचणींना सामोरे जावे लागले. या देशांतील विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली. मात्र चीनमधील विमान सेवेवरती मायक्रोसॉफ्ट गोंधळाच्या 48 तासांत विशेष परिणाम जाणवला नाही. तंत्रज्ञानामध्ये प्रगत समजणाऱ्या इंग्लंड आणि अमेरिका यांसारख्या देशांचीही मायक्रोसॉफ्ट सर्वर प्रणाली बिघाडापुढे हतबलता दिसून आली. अशा परिस्थितीत चीनने स्वतःच्या विविध सेवा सुरक्षित कशा ठेवल्या, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चीनला कमी परिणाम जाणवला, यामागे विविध कारणे असल्याचे तज्ञांचे मत आहे. चीनने सायबर सिक्युरिटी, ऑपरेशन्स याबाबतीत परदेशी सेवा पुरवठादार तसेच त्रयस्थ कंपन्यांवरील अवलंबित्व कमी केले आहे. हे मायक्रोसॉफ्ट गोंधळाचा विशेष फटका न बसण्याचे एक प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच अमेरिका, युरोप आणि दक्षिण आशियाच्या काही भागांच्या तुलनेत चीनमध्ये मायक्रोसॉफ्ट गोंधळाचा कमी परिणाम झाला.